आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हास्यस्फोटक ‘फार्स’ - ‘वासूची सासू’ नव्याने रंगभूमीवर !!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘फार्स’ हा नाट्यप्रकार म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक सदाबहार अध्याय. सत्तरच्या दशकापासून मराठी रंगभूमीवर एकाहून एक सरस फार्स सादर झाले. अतिशय साधे कथानक पण त्यातील अनेक व्यक्तिरेखांच्या विविध स्वभाव वैशिष्ठ्यांमुळे साध्या कथानकास अवांतर फाटे फोडून एक हास्यस्फोटक कथानक मांडण्याचा हा लोकप्रिय प्रकार.
प्रदीप दळवी लिखित ‘वासूची सासू’ हा फार्स तर लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. एका पुरुषाने मेलेल्या सासूचे सोंग घेणे आणि डबलरोलमध्ये वावरणे म्हणजे सातमजली हसवणूकच, त्यातही ते चंद्रनमस्कार, ते लाडीक ‘शीतल, शीतल..’ ‘फार त्रास झाला हो हिच्या वेळेला’ वगैरे सासूच्या संवादांनी प्रेक्षकांना हसून हसून बेजार केले होते.
हीच सासू पुन्हा एकदा रंगभूमीवर आणून नव्याने फार्सिकल नाटकांचा अनुभव प्रेक्षकांना देण्याचे निर्मात्या अनुराधा वाघ यांनी ठरवले. त्याकरता या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सध्याचे आघाडीचे नाट्यदिग्दर्शक मंगेश कदम यांच्याकडे सोपवली आणि आता ही ‘वासूची सासू’ आशय प्रॉडक्शन या नाट्यसंस्थेतर्फे पुन्हा अवतरली आहे
‘आशय प्रॉडक्शन’साठी मंगेश कदम यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘सुखांत’ या नाटकाला राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेत विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले होते, सर्वोत्कृष्ट नाटक - तृतीय, सर्वोत्कृष्ट लेखन – रत्नाकर मतकरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता – मोहन जोशी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नंदिता धुरी अशी मानाची पारितोषिक या नाटकाला मिळाली. या यशस्वी कामगिरीनंतर एक तितकेच सक्षम आणि दमदार नाटक देण्याच्या दृष्टीकोनातून दिग्दर्शक मंगेश कदम यांनी कसून तालीम सुरु केली आहे.
या नव्या संचातल्या 'वासूच्या सासू'मध्ये प्रेक्षकांसाठीही अनेक आश्चर्याचे धक्के आहेत. ‘उंच माझा झोका’ या मालिकेत ‘न्या. महादेव गोविंद रानडे’ ही भूमिका साकारणाऱ्या आणि सध्या लोकप्रियतेच्या लाटेवर असलेल्या विक्रम गायकवाडचा सर्वस्वी एक वेगळा असा लोभस वासू या नाटकात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या मालिका विश्वात प्रेक्षकप्रिय असलेली परी तेलंग या नाटकात एका खट्याळ भूमिकेत आहे. स्वप्नील फडके, विनोद गायकर, श्रद्धा गायकर, पौर्णिमा आहिरे-केंडे हे सध्या रंगभूमीवर विविध नाटकात गाजणारे हुकुमाचे एक्के या नाटकात एकत्र आले आहेत. या सगळ्यांची लाडकी, नखरेल सासू साकारतोय नव्या दमाचा कॉमेडी किंग प्रणव रावराणे. टायमिंग सेन्सचं अफलातून दर्शन घडवत विनोदाचे हास्यस्फोट घडवणारा अभिनेता ही प्रणवची सध्याची रंगभूमीवरील ठळक ओळख. ‘दुनियादारी' या सध्या गाजत असलेल्या चित्रपटातील सुनील भोसले ऊर्फ सॉरी भोसले या व्यक्तीरेखेने प्रणवला स्टार स्टेट्स मिळाले आहे. त्यामुळेच त्याच्या नव्या नाटकाबद्दल आणि हटके व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे.
या नाटकाचे खट्याळ संगीत अशोक पत्की यांचे असून नेपथ्य अजय पुजारे तर प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. दर्जेदार नाटक आणि सूत्रधार मंगेश कांबळी हे समीकरण याही नाटकाच्या निर्मितीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. या नाटकाचा अलीकडेच शुभारंभ झाला आहे.
पुढे बघा या नाटकाची एक छोटीशी झलक..