आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला आणि कौशल्य म्हणजेच अभिनय; जाणून घ्या अतुल कुलकर्णींविषयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता जन्मावा लागतो, शिकून कला येत नाही, हे मला मान्य नाही. अभिनय, कला हे एक कौशल्य आहे, ते शिकावे लागते. तुम्ही एखादा स्वभाव घेऊन जन्माला येता, गुणवत्ता घेऊन नाही, असे मला मनोमन वाटते, हे विचार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी याचे.
वळू, नटरंगफेम सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांची एक प्रकट मुलाखत घेतली गेली त्यात अतुलने सविस्तर भाष्य केले. सात भाषेतील आठ नाटके आणि सुमारे पंचेचाळीस चित्रपट यांचा गाढा अनुभव पाठीशी असलेल्या अभिनेता अतुल हा सध्या आघा़डीचा अभिनेता मानला जातो.
अभिनय कसा जोपासला या प्रश्नावर अतुल म्हणतो, मी मूळचा बेळगावचा पण माझे सगळे कुटुंबीय सोलापूरला स्थायिक झाले. त्यामुळे माझे बालपण तिथेच गेले. दहावी, बारावीतील आपट्या नंतर सायन्स, इंजिनिअरिंग पण इंजिनिअरिंग मध्येच सोडून सोलापूरमध्ये कला शाखेत प्रवेश, अशा अनेक स्थित्यंतरांनंतर बीएला असताना कॉलेजमध्ये पहिल्यांदा नाटक केले आणि तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला.
पुढे यात गोडी निर्माण होतेय असे वाटल्याने सोलापुरातील नाट्यआराधना या संस्थेशी संलग्न असताना पहिल्यांदा बॅकस्टेज केले. नंतर नाटक या नावाची पहिली एकांकिका केली आणि मग मात्र अभिनय क्षेत्राशी जोडला गेलो. त्यामुळे अभिनयाची आवड जोपासली गेली असे नव्हे तर ते हळूहळू येत गेले.
नंतर मात्र एनएसडी मध्ये गेलो आणि सर्वार्थाने अभिनयाचा झालो. अभिनय, कला हे एक कौशल्य आहे, ते शिकावे लागते हे मनात घट्ट रुजले. एरवी बाहेर ज्या गोष्टी समजायला सात-आठ वर्षे खर्ची घालावी लागली असती ते एनएसडीमुळे तीन वर्षीत मिळाले आणि नंतर मला माझे पहिले नाटक गांधी विरुद्ध गांधी देखील मिळाले. या माझ्या पहिल्याच व्यावसायिक नाटकाने मला ओळख मिळाली. त्यावेळच्या सगळ्या दिग्गजांबरोबर काम करायला मिळाले. हे नाटक खूप आव्हानात्मक होते.
दिग्दर्शकाचे योगदान किती या प्रश्नावर अतुल म्हणाले की, एक माणूस म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये सगळ्या प्रकारच्या भावभावना असतात. पण एक नट म्हणून मला दिग्दर्शकाने जे सांगितले आहे तेवढे त्यातले बाहेर काढणे महत्वाचे वाटते. भाषा ओळखीची नसली की संवादावर किती परिश्रम घ्यावे लागतात या प्रश्नावर ते म्हणाले की, माझे बालपण बेळगावमध्ये गेल्याने कन्नडची ओळख आहे, ती भाषा समजते, थोडीफार बोलता येते. त्यामुळे दक्षिणी भाषांचा फ्लेवर माहित आहे. त्यामुळे त्यातील संवाद मी देवनागरीत लिहून घेतो, पण कधीकधी उच्चार चुकू शकतात. पण दक्षिणेत ते डबिंगमध्ये सगळं सांभाळून घेतात. संवाद मात्र पाठ करावे लागतात. लिखाणाकडे कसे काय वळलात या प्रश्नावर ते म्हणाले की, वृत्तपत्रीय लिखाण ठरवून झाले नाही, मनातून जेव्हा वाटलं, तेव्हा लिहिलं गेलं. अपरिहार्यपणे लिखाण जमत नाही. त्यासाठी मनातून वाटणं गरजेचं आहे.
अतुल कुलकर्णी व त्यांच्या अभिनेत्री पत्नी गीतांजली कुलकर्णी दोघेजण मिळून क्वेस्ट म्हणजे क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्टचे काम सांभाळतात. हा वेगळ्या वाटेवरचा प्रवास कसा काय घडला यावर ते म्हणाले की, काही गोष्टींचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, शिक्षणातील सगळ्या समस्यांचे मूळ चुकीच्या शिक्षणपद्धतीत आहे. त्यामुळे मग ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सोनाळे या छोट्या गावी शिक्षक, मुले यांच्याबरोबर प्रयोग करीत आमची शाळा सुरु आहे. आणि असाच एक वेगळ्या वाटेवरचा प्रयोग सातारा येथील वनकुसवडे या गावात करीत आहोत. तो म्हणजे तिथे जागा घेतली आणि तिथला निसर्ग जोपासण्यासाठी तिथली परिसंस्था कायम ठेवून माळ फुलवला.