आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन, बहुगुणी कलाकार हरपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार (64) यांचे सोमवारी कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून कुलदीप पवार यांना अंधेरीतल्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एका नाट्यप्रयोगासाठी 15 फेब्रुवारीला पुण्यात आलेल्या पवार यांना अस्वस्थ वाटल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचाराकरता त्यांना मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मालिका, नाटक आणि अनेक सिनेमा अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या कुलदीप पवार यांच्या अशा अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
साधा भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध भूमिका पवारांनी अतिशय ताकदीनं उभ्या केल्या. छोट्या पडद्यावरही पवारांनी अभिनयचा ठसा उमटवला. मूळ कोल्हापूरचे असलेले पवार यांनी घर सोडले आणि कराड, पुणे असा प्रवास करत ते मायानगरी मुंबईत दाखल झाले. भारदस्त आवाज आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे त्यांना एकामागून एक चांगल्या भूमिका मिळत गेल्या. मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अश्रूंची झाली फुले, होनाजी बाळा, वीज म्हणाली धरतीला अशी काही गाजलेली नाटके त्यांना मिळाली. 'पती माझा उचापती' हे गाजलेले नाटकंही त्यांचेच. तर जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव, असे त्यांचे अनेक सिनेमे रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. छोट्या पडद्यावरही त्यांनी ‘परमवीर’मधून आपली वेगळी छाप पाडली. 'तू तू मैं मैं' या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवले.