आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार अनंतात विलीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारताना रसिक मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार (64) यांचे सोमवारी कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अशोक सराफ, रमेश भाटकर, मोहन जोशी यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
गेल्या आठवडाभरापासून कुलदीप पवार यांना अंधेरीतल्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
साधा भोळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध भूमिका पवारांनी अतिशय ताकदीनं उभ्या केल्या. छोट्या पडद्यावरही पवारांनी अभिनयचा ठसा उमटवला. अश्रूंची झाली फुले, होनाजी बाळा, वीज म्हणाली धरतीला अशी काही गाजलेली नाटके त्यांना मिळाली. 'पती माझा उचापती' हे गाजलेले नाटकंही त्यांचेच. तर जावयाची जात, बिनकामाचा नवरा, नवरे सगळे गाढव, असे त्यांचे अनेक सिनेमे रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. छोट्या पडद्यावरही त्यांनी ‘परमवीर’मधून आपली वेगळी छाप पाडली. 'तू तू मैं मैं' या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांना पोटधरुन हसवले.