आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेते विनय आपटेंचे निधन; रंगभूमीचा भारदस्त आवाज हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अशा चतुरस्र भूमिकेतून नाटक, सिनेमा व टीव्ही अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये आपला कोरीव ठसा उमटवणार्‍या विनय आपटे (62) यांचे शनिवारी निधन झाले. छातीत दुखत असल्यामुळे अंधेरीच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू असताना पावणेसहा वाजता त्यांची प्राणज्योतमालवली.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. शुक्रवारी त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली.
1974 साली दुरदर्शनच्या माध्यामातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर कधीही मागे वळून पाहण्याची वेळ या कलाकारावर आली नाही. मी राजहंस एक या उक्तीप्रमाणे चित्रपट असो वा नाटक प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि वेगळी ओळख विनय आपटेंनी निर्माण केली. मराठी चित्रपटसृष्टीतील भारदस्त आवाज आणि तेवढ्याच ताकदीचा कलाकार चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीने गमावलाय. त्यांच्या अभिनयाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीला सुद्धा घ्यावी लागली होती. कुठे खलनायक तर कुठे चरित्र अभिनेता या भूमिका त्यांनी तेवढ्याच ताकदीने साकारल्या आणि जीवंत केल्यात. टेलिव्हिजन, चित्रपट आणि रंगभूमीवरचा चतुरस्त्र आणि वेगळ्या जातकुळीचा अभिनेता ओळखले जाणारे विनय आपटे अनेक मराठी कलाकारांचे गुरु होते.
महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोल, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, सुकन्या कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकारांना पारखून त्यांना चित्रपट आणि रंगभूमीवर आणण्याचे श्रेयसुद्धा विनय आपटे यांना जातं.
अलीकडचे आलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकेत विनय आपटे यांनी काम केले होते. मराठीसह सत्याग्रह, आरक्षण, धमाल, इट्स ब्रेकिंग न्यूज, चांदनी बार, एक चाळीस की लास्ट लोकल अशा हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. विजय तेंडुलकरांनी लिहलेल्या‘मित्राची गोष्ट’यासह असंख्य नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.
विनय आपटे 'गणरंग' या नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक होते. 'डॅडी आय लव्ह यू', 'तुमचा मुलगा करतो काय? आदी नाटकांसाठी त्यांनी व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. 'कमलीचं काय झालं?' हे त्यांचे व्यवस्थापक म्हणून शेवटचे नाटक ठरले.
विनय आपटे यांच्या अकाली निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी पोरकी झाली आहे. काही मान्यवरांनी विनय आपटे यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या वाचण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...
रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीच्या या राजहंसाला www.divyamarathi.com कडून भावपूर्ण श्रद्धांजली.