आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धग’ चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग अखेर खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठी चित्रपट कितीही चांगला असला तरी त्याला वितरक मिळणे फार कठिण असते. राष्ट्रीय पुरस्कारासह 47 पुरस्कार मिळवणार्‍या ‘धग’ चित्रपटालाही वितरक मिळत नसल्याने चित्रपट डब्यात पडून होता. मात्र आता त्यावरचे मळभ दूर झाले असून सात मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते विशाल पंडित गवारे यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

शिवाजी लोटन पाटील यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात भूमिकेसाठी नायिका उषा जाधव आणि बाल कलाकार हंसराज जगताप यांच्यासह चित्रपटाला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत. शिवाजी लोटन पाटील यांचा पहिला चित्रपट वावटळही चांगलाच गाजला होता.

गवारे यांनी सांगितले, चित्रपट निर्माण करणे सोपे आहे परंतु तो पडद्यावर आणणे महाकठीण काम आहे. मराठीऐवजी हा चित्रपट हिंदीत असता तर तो कधीच प्रदर्शित झाला असता. परंतु मराठी चित्रपट व्यवसाय करीत नसल्याने आणि आमच्या चित्रपटात नामवंत कलाकार नसल्याने वितरकांनी चित्रपटाकडे दुर्लक्ष केले. परंतु आता हा चित्रपट दार मोशन प्रदर्शित करण्यास पुढे आले आहे. राज्यातील 150 पेक्षा जास्त चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित केला जाईल. राज्यभरातील प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी मोठय़ा प्रमाणावर उत्सुकता अहे.

35 चित्रपट सोडले : उपेंद्र लिमये
‘धग’मध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणार्‍या उपेंद्रने सांगितले की, मला अभिनयाची भूक असून दज्रेदार चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो. जोगवानंतर मला तशाच प्रकारच्या भूमिकांच्या अनेक ऑफर आल्या. मात्र मी तेव्हा जवळ-जवळ 35 चित्रपट सोडले. माझी पत्नीही माझ्यावर रागावली, परंतु मला कसलेही चित्रपट करावयास आवडत नसल्याने मी ते चित्रपट सोडले. मला माझ्या भूमिकेपेक्षा संपूर्ण कथानक चांगले असलेले चित्रपट करावयास आवडतात. अर्थात कधी-कधी चांगली कथा सुरुवातीला दिसते परंतु ती तशीच पडद्यावर योग्यरीत्या मांडली न गेल्याने चित्रपट अयशस्वी झाल्याचा अनुभवही आहे. धगनंतर यलोमध्ये माझी भूमिका वेगळी आहे. हा वेगळ्या विषयावरील चित्रपट असला तरी तो संपूर्ण मनोरंजक पद्धतीने तयार करण्यात आला आहे.

चहाच्या टपरीवर कथा ऐकली
चित्रपटाच्या निर्मितीबद्दल बोलताना विशाल गवारे म्हणाले, नितीन दीक्षितने चहाच्या टपरीवर मला कथा ऐकवली तेव्हाच मी चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतला. उपेंद्र लिमये, नागेश भोसले या दोघांव्यतिरिक्त सर्व कलाकार नवे होते. परंतु या सगळ्या कलाकारांनी उत्कृष्ट काम केल्यानेच हा चित्रपट तयार झाला. पुरस्कारप्राप्त हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.