आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉरिशसमध्ये रंगणार 'मराठी फिल्म फेस्टिव्हल'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटाचं आता जागतिक पातळीवर गौरविला जातोय. अनेक फेस्टिव्हल्समध्ये मराठी चित्रपटांचा झेंडा डौलाने फडकत आहे. इतकंच नाही तर आता मायमराठीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यायला लावणारा ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ (MF2) लवकरच मॉरिशसमध्ये रंगणार आहे. ‘शार्दुल क्रिएशन्स’ आणि ‘इंटरनॅशनल कल्चरल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन मॉरिशसमध्ये करण्यात येत आहे. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान पाच दिवस रंगणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा आणि मान्यवरांचा सहभाग असणार असल्याची माहिती अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी शार्दुल क्रिएशन्सचे शिरीष राणे, इंटरनॅशनल कल्चरल फोरमचे दिलीप ठाणेकर, अभिनेता-दिग्दर्शक विजय पाटकर यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये सहभागी होण्यासाठी या संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आले असून 5 फेब्रुवारी ही अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत आहे. यासंदर्भातील एका नामांकनाची घोषणा मुंबई येथे करण्यात येणार आहे. निवड झालेल्या अंतिम 8 चित्रपटांचे प्रदर्शन मॉरिशसमध्ये होणाऱ्या महोत्सवामध्ये करण्यात येईल. विजेत्या तीन चित्रपटांची घोषणा मुख्य सोहळ्यात करण्यात येईल.
मॉरिशसमध्ये आयोजित होणाऱ्या या सोहळ्यासोबत अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी निर्मात्यांसाठी मॉरिशस येथे एक खास कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून यात मराठी चित्रपटांना मॉरिशसमध्ये चित्रीकरण करण्यासंदर्भातील सोयी-सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. सोबत सध्याच्या मराठी चित्रपटांचा आढावा घेणारा मान्यवरांचा परिसंवादही रंगणार आहे. याशिवाय मराठी कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’ अंतर्गत करण्यात येणार आहे.