आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film : Houn Jaun Dya Complete Within 16 Days

मराठी चित्रपट : ‘... होऊन जाऊ द्या’ अवघ्या 16 दिवसांत पूर्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘पहाटे 5.30 ला चहा येणार आणि आवरून 7 वाजता सेटवर हजर राहायचे,’ असा अलिखित नियम मराठी कलाकारांवर आजवर कोणीही घातला नव्हता. चित्रीकरणाला कधीही उगवणा-या छोट्या-मोठ्या कलाकारांना शिस्तीचे धडे अमोल पालेकर यांनी शिकवले. परिणाम असा की चक्क 16 दिवसांत मल्टिस्टार विनोदी चित्रपट पूर्ण झाला. येत्या 26 एप्रिलला महाराष्ट्रभरात ‘वुई आर ऑन...होऊन जाऊ द्या’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वुई आर ऑन...होऊन जाऊ द्या’ या चित्रपटाने मराठी कलासृष्टीतील 22 कलाकारांना शिस्तीचे धडे शिकवल्याने कलाकारांनी म्हणूनच ‘अनान’ या निर्मिती संस्थेचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. अशोक सराफ, दिलीप प्रभावळकर, मकरंद अनासपुरे, रमेश भाटकर, मनोज जोशी, आनंद इंगळे, अतिषा नाईक, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ यांच्यासह 22 कलाकारांची तगडी स्टारकास्ट घेऊन तयार करण्यात आलेला ‘वुई आर ऑन...होऊन जाऊ द्या’ हा विनोदी चित्रपट अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला आहे. निर्माता विजय केंकरेंनीही या चित्रपटात भूमिका केली आहे, हे या चित्रपटाचे वेगळेपण म्हणता येईल. या चित्रपटाचे चित्रीकरण अवघ्या सोळा दिवसांत पूर्ण झाले याचे कारण पालेकरांच्या ‘अनान’ निर्मितीचे परफेक्ट मॅनेजमेंट असे या चित्रपटात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराचे म्हणणे आहे.

ओढूनताणून नव्हे तर नैसर्गिकरीत्या येणारा विनोद पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतलेल्या संध्या गोखले यांच्यासकट सगळ्या कलाकारांनी या विनोदी चित्रपटात क्रिकेट मॅच असल्याचे गुपित उघड न करता चित्रपटातील झगमगत्या ता-यांच्या लोकप्रियतेवरच अधिक भर दिला.‘विनोदबुद्धी नाही’ असे सातत्याने म्हटल्या गेलेल्या संध्या गोखले यांनी या धमाल विनोदी चित्रपटाच्या संहितेची जबाबदारी उचलल्याने चित्रपटाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शिस्तबद्ध निर्मिती संस्था
अमोल पालेकरांच्या निर्मिती संस्थेसोबत काम केलेले सर्व मराठी कलाकार त्यांच्या शिस्तबद्धतेबद्दल भरभरून बोलताना दिसतात. पहाटे 5.30 ला चहा तयार असणे आणि दिवसभरातील आखलेल्या गोष्टी पूर्ण करणे अशा ‘अनान’ या निर्मिती संस्थेच्या शिस्तबद्धतेमुळे कमी दिवसांत मोठ्या बॅनरचा विनोदी चित्रपट तयार झाला, असे कलाकार सांगतात. ‘कुटुंब’ असलेली नाट्यसंस्था ‘मिस’ करते : वंदना गुप्ते
पूर्वी आम्ही नाटके करायचो तेव्हाच्या नाट्यसंस्था कुटुंबाप्रमाणे असायच्या. दौरे करायचो. त्यातून ही कुटुंबसंस्था अधिक घट्ट होत जायची. आता मी अशी कुटुंबसंस्था असलेली नाट्यसंस्था मिस करते, असे अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी सांगितले.

चांगल्या संहितेसाठी 3 वर्षे वाट पाहिली : पालेकर
ज्येष्ठ कलाकार आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या मनातील विनोदी मराठी चित्रपट काढण्यासाठी तीन वर्षे वाट पाहिल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षे चांगली विनोदी संहिता लिहू शकणारा न सापडल्याने वा त्या लेखकाशी न जुळल्याने अखेरीस संध्या गोखले यांनीच संहिता लेखनाचे काम केले आणि आता ‘वुई आर ऑन...होऊन जाऊ द्या’ हा चित्रपट तयार झाला, असे अमोल पालेकर यांनी सांगितले.