आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - ‘प्रेमाचा झोल झाल’ या चित्रपटात मी जरी बाबाच्या भूमिकेत असलो तरी हा देश बाबांच्या पाठीमागे जाऊ नये, असे मला वाटते. हे विज्ञानाचे युग असल्याने स्वत:च्या सार्मथ्यावर विश्वास ठेवून आजच्या तरुणांनी काम करायला हवे, असे मत अभिनेता सिद्धार्थ जाधवने व्यक्त केले.
सोमवारी ‘प्रेमाचा झोल झाल’ या चित्रपटाच्या टीमने ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ज्याप्रमाणे सिद्धार्थ विनोदाची धमाल उडवून देतो तिच शैली कार्यालयात आजमावत त्याने सर्वांना आपलेसे करून घेतले. या वेळी निर्माता सिद्धांत पिलनिया, संगीत दिग्दर्शक अमित राज, गायक आदर्श शिंदे, नायिका स्मिता गोंदकर आणि विजय न्यायाधीश यांची उपस्थिती होती. चित्रपटाबाबत आणि दिवाळीच्या साजरीकरणाबाबतच्या विविध प्रश्नावर त्याने दिलखुलास गप्पा केल्या.
आपल्या देशात बाबा-बुवांचे प्रमाण अधिक आहे आणि चित्रपटांमुळे त्याकडे कल वाढतो असे वाटते का?
आपल्या देशात अध्यात्म पूर्वीपासून आहे. बाबा-बुवांचे प्रमाण मोठे असले तरीही युवापिढी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. बाबा-बुवांवर किती विश्वास ठेवावा हे सर्वांना कळते. सत्य पुढे येण्यापासून जगातली कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण संपूर्ण देश सध्या अनुभवत आहे.
विनोदाने मनोरंजन करण्यासोबतच समाजाला संदेश देणारे चित्रपट करणार का?
मी महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती अभियानात कार्यरत आहे. मी स्वत: दारू, सिगारेट या व्यसनांपासून लांब आहे. त्याचेच सर्मथन मी माझ्या प्रत्येक कामातून करतो. युवाशक्ती विकासाच्या दिशेनेच जायला हवी, व्यसनाधीनता विकासाचा वेग कमी करते. मी कलावंत आहे, माझ्या कामातून मी कायम संदेश देतच आहे. हसा खेळा आणि मजेत आयुष्य घालवा.
स्वत:च्या कामाबद्दल समाधानी आहात की प्रतिमा बदलायची इच्छा आहे ?
प्रतिमा बदलण्याची फारशी आवश्यकता वाटत नाही. दुनियादारी, टाइमप्लीज या चित्रपटांशी मिळत्या जुळत्या चित्रपटांतून मी भूमिका केल्या. सशक्त आणि संदेशात्मक, कादंबर्यांवर बेतलेल्या चित्रपटांतूनही मी माझ्या पद्धतीच्या अभिनयाने लक्ष वेधत आहेच, मग प्रतिमा बदलण्याचा अट्टहास का करू ! चित्रपटांच्या सुवर्णकाळात माझी एन्ट्री झाली आहे. यापूर्वी झाली असती तर कदाचित मला कुठलीच संधी मिळाली नसती. त्यामुळे उगाच आपल्या जमेच्या बाजू सोडून दुसरीकडे लक्ष केंद्रित करणे मला चुकीचे वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.