('रमा माधव' या आगामी सिनेमाचे पोस्टर)
रमा माधव म्हटलं की कित्येक वर्षांपूर्वी मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी यांनी 'स्वामी' या मालिकेत साकारलेल्या अविस्मरणीय भूमिकांचे स्मरण होतं. तेव्हा रमाबाई साकारणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आगामी 'रमा माधव' या मराठी सिनेमातून दिग्दर्शनात दुसरं दमदार पाऊल टाकत आहेत. विशेष म्हणजे त्या काळजी रमाबाई आणि माधवराव पेशव्यांची भूमिका साकारणारी मृणाल कुलकर्णी आणि रवींद्र मंकणीची सुपरहिट जोडी या सिनेमात नानासाहेब पेशवे आणि गोपिकाबाईची भूमिका साकारत आहेत.
नानासाहेब पेशवे हे मुत्सुद्देगिरी, चोख हिशेब, कारभारावर घारीसारखी नजर आणि योग्य न्यायदानामुळे ते रयतेच्या गळ्यातील ताईत होते. जातीभेद राज्याला घातक आहे हे ओळखून त्यांनी रयत, मुसुद्दी, सरदार आणि खुद्द पेशवे हे छत्रपतींचे चाकर आहेत, ही भावना रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नानासाहेबांच्या व्यक्तिरेखेतील अनेक कंगोरे रवींद्र मंकणी यांनी 'रमा माधव' या सिनेमात लीलया साकारलेत.
नानासाहेबांच्या पत्नीच्या गोपिकाबाईंच्या व्यक्तिरेखेलादेखील अनेक कंगोरे आहेत. तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या धोरणी पेशवीण म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात रस असलेल्या गोपिकाबाईंचा विवाह खुद्द छत्रपतींनी लावून दिला होता. चुलत दिरापासून आपल्या वारसाच्या हक्काला धोका आहे. या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी गृहकलह सुरु केला. गोपिकाबाईंची ही वेगळी भूमिका मृणाल कुलकर्णी यांनी तितक्याच तडफदारपणे साकारली आहे.
रवींद्र मंकणी आणि मृणाल कुलकर्णी यांच्यासह अभिनेता प्रसाद ओकसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत सिनेमात झळकणार आहे. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे कनिष्ठ बंधू रघुनाथ बाजीराव भट अर्थात राघोबादादांच्या भूमिकेत प्रसाद ओक दिसणार आहे. नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या.
रघुनाथराव यांच्या पत्नी 'आनंदीबाईं'च्या भूमिकेत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडणार आहे. या सिनेमात रमा माधव यांच्या भूमिकेत कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा 'रमा माधव' या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित सिनेमाची खास झलक...