आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Tapal Receive Appreciation In Film Festivals

प्रदर्शनापूर्वीच अनेक चित्रपट महोत्सवात 'टपाल'ला उत्तम प्रतिसाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लिश विंग्लिश, बॉस, ब्ल्यू यांसारख्या हिंदी सिनेमांचे छायाचित्रण करणारे लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा म्हणजे "टपाल". मैत्रेय मास मिडियाचे सिनेनिर्मिती क्षेत्रातील ही पहिलीच निर्मिती असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांचा या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल आणि १२व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात मोठ्या आणि मानाच्या समजल्या जाणार्‍या दक्षिण कोरियात बुसान येथे बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "टपाल" ची निवड झाली होती. "टपाल" चा जागतिक प्रिमिअर हा तेथेच ऑक्टोबर २०१३ साली संपन्न झाला होता. तेथेही या चित्रपटाला रसिकांचा तसेच विविध देशातून आलेल्या मान्यवर मंडळींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या भारतीय चित्रपट महोत्सवातही "टपाल" ची निवड झाली आहे. सिडनी, फ्रान्समधील वेसोल, अमेरिकेतील लॉस एंजिल्स, इटली, जर्मनी, चीन या देशांमधूनही "टपाल" ला निमंत्रण मिळाले आहे.
या सिनेमाची कथा ७०च्या दशकातील आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर निरागसता, नात्यांमधील भावनिक गुंतण आणि मानवी मूल्य यांची अत्यंत प्रामाणिक आणि सुरेखपणे केलेली गुंफण म्हणजे "टपाल". पोस्टमन देवराम व त्याची पत्नी तुलसा यांच्या आयुष्यात घडणारी एक घटना. त्यांच्याच नव्हे तर त्याच गावातील रंगाच्याही आयुष्यात अमिट ठसा उमटवणारे दोन दिवस या माध्यमातून कथाकार आणि दिग्दर्शक यांनी भावनांची अशी काही रोलर-कोस्टर राईड या चित्रपटात उभी केली आहे की बघताना प्रेक्षक खिळून राहतो. चित्रपटाची कथा टिंग्या फेम श्री मंगेश हडवळे यांची असून अभिनेते नंदू माधव, अभिनेत्री विणा जामकर आणि मैत्रेय मास मिडियाचे डायरेक्टर मिलिंद गुणाजी हे प्रमुख भूमिकेत आहेत.
पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवण्यात आलेल्या या चित्रपटाच्या खेळासाठी याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, अभिनेता नंदु माधव, अभिनेत्री वीणा जामकर तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते. चित्रपटाच्या शेवटी सिनेरसिकांनी टाळ्या वाजवून ‘टपाल’ टीमचे अभिनंदन केले. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार असून त्याला सर्वसामान्य रसिकांची कशी पसंती मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.