आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लई भारी’ मराठी चित्रपटाच्या मार्केटिंगचा चेहरा बदलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठीमध्ये उत्तमोत्तम आशयसंपन्न विषय हाताळले जातात. मात्र, मार्केटिंगमध्ये कमी पडत असल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ‘लई भारी’च्या निमित्ताने मी मराठीत पदार्पण करतोय. तेव्हा बॉलीवूडची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून चित्रपटाचे प्रमोशन करत आहोत. या चित्रपटाला यश मिळेल की नाही, किती मिळेल हे आत्ताच सांगता येणार नाही. पण हे नक्की की हा चित्रपट मराठीत मार्केटिंग स्ट्रॅटेजीत आमूलाग्र बदल घडवून ट्रेंड सेट करेल, असा विश्वास मराठवाड्याचा लाडका अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केला.

‘लई भारी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रोझोन मॉल येथे पत्रकार परिषदेत तो बोलत होता. साजिद नाडियादवाला यांनी 7 ते 8 वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथेवर ‘लई भारी’ आहे. चित्रपट म्हणजे भावना, विचार पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. यातून भावना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. या चित्रपटासाठी मी पुढाकार घेतल्यानंतर मराठीवर प्रेम करणारे आणि मराठीतील अनेक दिग्गज आपणहून पुढे आले. गणेश आचार्य, सलमान खान यांनी स्वत:हून चित्रपटात येण्याची उत्सुकता दाखवल्याने सलमानसाठी खास रोल तयार केला. अजय-अतुल जोडीने संगीताच्या क्षेत्रात धमाल उडवली आहे, फक्त मराठीच नाही हिंदीतही त्यांनी ठसा उमटवला आहे.

भावना पोहोचणे महत्त्वाचे :
पुणे-मुंबईतील मराठी प्रेक्षक इंग्रजाळलेला आहे, हे खरे आहे. मराठी चित्रपटांपेक्षा हॉलीवूडपट पाहणे पसंत केले जाते, असे असताना लई भारी पाहण्यासाठी प्रेक्षक येतील. कारण मानवी भावना जगाच्या पाठीवर सर्वदूर सारख्याच आहेत. चित्रपटातून भावना पोहोचविता आल्या पाहिजेत. चित्रपट आपोआपच चालतो.

मराठी चित्रपट 100 कोटींचे आहेतच :
हिंदी चित्रपटाचे क्षेत्र संपूर्ण देशभराचे आहे. अलीकडे आपल्याकडे प्रदर्शित झालेले दुनियादारी, टाइमपास, बीपी या चित्रपटांनी महाराष्‍ट्रात 30 कोटींचा गल्ला जमवला, देशाच्या पातळीवर समीकरण पाहिले तर 100 कोटींचा गल्ला होतोच, असेही तो म्हणाला. या वेळी प्रोझोनचे प्रमुख अनिल इरावणे यांचीही उपस्थिती होती.

बाबांच्या नावाने आलो

बाबांचे स्वप्न होते मी मराठीत काम करावे. ते असताना शक्य झाले नाही, पण या चित्रपटाच्या निमित्ताने मी मराठीत आलो तेव्हा विलासरावंचे नाव आवर्जून घेतले. तुझे मेरी कसमच्या वेळी असे केले नाही. कारण तेव्हा हा विचारच मनात आला नव्हता. जनता बाबांवर खूप प्रेम करायची. त्यांच्या आयुष्यावर चित्रपट करण्याबद्दल मी अजून तरी विचार केलेला नाही. त्यांच्या आयुष्याचा कॅन्व्हास खूप मोठा आहे. तो पूर्णपणे आवाक्यात आणता येण्यासारखे काही झाले तर नक्कीच चित्रपट करीन.