आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटिक वाजते ‘मकाऊ’त!; चौथ्या मिक्ता पुरस्कार सोहळ्यात ‘दुनियादारी’ने मारली बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकाऊ- मकाऊ येथे भव्यदिव्य आणि देखण्या चौथ्या मिक्ता पुरस्कार सोहळ्यात अपेक्षेप्रमाणेच ‘दुनियादारी’ चित्रपटाने सर्व प्रमुख पुरस्कार पटकावून बाजी मारली, तर नाटक श्रेणीमध्ये ‘यू अँड मी’ आणि ‘प्रपोजल’ या दोन नाटकांनी पुरस्कार पटकावून आपला वरचश्मा कायम ठेवला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांना दिलेला गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार ही या पुरस्कार सोहळ्याची मुख्य वैशिष्ट्ये.

मकाऊ येथील व्हेनेटियन या पंचतारांकित हॉटेलच्या भव्य बॉलरूममध्ये मिक्ताचा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम स्थापित करणार्‍या ‘दुनियादारी’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक (संजय जाधव), अभिनेता (विभागून अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी) आणि अभिनेत्री (सई ताम्हणकर) असे सर्व प्रमुख पुरस्कार पटकावले. नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘दुनियादारी’च्या टीमने अत्यंत जोशात हे पुरस्कार स्वीकारले.

पद्मजा फेणाणी यांच्या गणेशस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुष्कर श्रोत्री आणि वैभव मांगले या जोडगोळीने नेहमीच्या खुसखुशीत शैलीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. घोषित पुरस्कार प्रदान केल्यानंतर आदिनाथ कोठारे आणि सोनाली कुलकर्णी यांनी थरथराट भाग दोन मधील गाणे सादर केले. यानंतर उर्मिला कानेटकर, भार्गवी चिरमुले आणि दीपाली सय्यद यांनी चित्रपटातील मुजरे सादर केले. क्रांती रेडकर आणि नीलेश साबळे यांनी सादर केलेल्या स्कीटने कार्यक्रमात खूपच रंगत आणली होती. मोहन जोशी, भारती आचरेकर, डॉ. महेश पटवर्धन, महेश मांजरेकर, मनवा नाईक आणि सुनील बर्वे यांनी त्यांची गाण्याची तयारी दाखवून देत कार्यक्रमाची रंगत वाढवली.

शरद पवार यांना गौरव महाराष्ट्राचा पुरस्कार दिल्यानंतर सचिन खेडेकर, वंदना गुप्ते आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. क्रिकेट, राजकारण आणि खाजगी विषयांसह अनेक प्रश्न शरद पवार यांना यावेळी विचारण्यात आले आणि शरद पवार यांनीही कसबी क्रिकेटरप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली.

भारतातही पुरस्कार सोहळा आयोजित करा- पवार
आपल्या देशातील विविध शहरांमधून मराठी माणूस मोठय़ा संख्येने राहत असल्याने एक वर्षाआड मिक्ता पुरस्कार सोहळा मुंबई, पुणे, नागपूर अशा प्रमुख शहरांच्या ठिकाणी आयोजित करण्यात यावा, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महेश मांजरेकर यांना केली. दिल्ली तसेच इंदूर शहरांचा विशेष उल्लेख त्यांनी या वेळी केला.

अन्य पुरस्कार चित्रपट
अभिनेत्री : सई ताम्हणकर (दुनियादारी)
अभिनेता : अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी (दुनियादारी)
दिग्दर्शक : संजय जाधव (दुनियादारी)
चित्रपट : दुनियादारी
सहा. अभिनेता : हृषीकेश जोशी (आजचा दिवस माझा)
सहा. अभिनेत्री : सई ताम्हणकर (आजचा दिवस माझा)

नाटक सर्वोत्कृष्ट : प्रपोजल
दिग्दर्शक : राजन ताम्हाणे (प्रपोजल)
सहायक अभिनेत्री : राधिका इंगळे (यू अँड मी)
अभिनेता : देवेंद्र सरळकर (यू अँड मी)
सर्वोत्कृष्ट पुनरज्जीवित नाटक : प्रेमा तुझा रंग कसा
परीक्षक विशेष पुरस्कार : यू अँड मी.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : अदिती सारंगधर (प्रपोजल)
अभिनेता - (विभागून) : स्वप्निल जोशी
(गेट वेल सून) आणि आस्ताद काळे (प्रपोजल).