आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी मालिकेतील अभिनेत्रींची वटपौर्णिमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यमाच्या तावडीतून सत्यवानाला वाचवण्या-या सावित्रीची आठवण ठेवून वटपौर्णिमा हा सण महिला सर्वत्र उत्साहाने साजरा करतात. रविवारी साज-या होणारा हा सण सध्या अनेक मालिकांत काही दिवसांपासून दिसत आहे. पडद्यावरील वैवाहिक आयुष्य रंगवताना वटपौर्णिमेचा गेटअप करून चित्रीकरण करणा-या या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील वटपौर्णिमेबद्दलची मते दै. दिव्य मराठीने जाणून घेतली.


मुंबई वगळता इतर शहरांत वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते. याबद्दल त्या त्या शहरांतील अभिनेत्रींना विचारल्यानंतर त्या जुन्या आठवणींत रमून गेल्या. अपूर्वा नेमळेकर, केतकी चितळे, हृता दुर्गुले या नायिकांनी तर साजशृंगार करून पडद्यावरील नव-याच्या दीर्घायुष्याची मागणी केली. ‘देवयानी’, ‘पुढचं पाऊल’ आणि ‘दुर्वा’ आदी मालिकांमधील कलाकारांची वटपौर्णिमा खास आमच्या वाचकांसाठी.


नागपूरात सणाची मजा काही औरच
हा सण तर सर्वत्रच साजरा केला जातो, मात्र नागपुरातील महिला या सणात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतात, हे मला वेगळेपण वाटते. एकाच रंगाची साडी नेसणे, एकत्र येऊन वडापाशी हसत, खेळत गाणी म्हणणे यामुळे विशेष मजा येते. या तुलनेत मुंबईत वडाच्या झाडांची संख्या कमी असल्याने महिला एक फांदी आणून घरीच पूजा करतात. उपवासासाठी भगर, बटाट्याच्या काच-या, दाण्यांच्या कटाची आमटी बनवली जाते.’
देवकी अर्थात मृणाल देशपांडे, ‘पुढचं पाऊल’, (नागपूर)


उपवासालाही खीर-पुरीचा बेत
मुंबई आणि नाशिक दोन्हीकडे सण सारखाच साजरा होतो. उपवास, वडाच्या भोवती दोरा बांधणे आणि सात जन्मी हाच पती मिळू दे अशीच इच्छा सर्वत्र असते. उपवास असला तरी पुरी- खीर खातो. मालिकेत माझे लग्न झालेले आहे. त्यामुळे हे करताना मलाही वेगळाच आनंद येत आहे.
दीपाली पानसरे, ‘देवयानी’, (नाशिक)


मॉडर्न मुलींनी या सणाचे मर्म समजून घ्यावे
पुण्यात वटपौर्णिमेला प्रसादासाठी आंबा ठेवला जातो. एकही दागिना न सोडता महिला नखशिखांत नटलेल्या असतात. परंपरेनुसार सर्व महिला आपल्या नव-याच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करतात. त्यामुळे सध्या मॉडर्न युगात जगणा-या मुलींनीदेखील यातील मर्म समजून घ्यावे. ’’
मंदोदरी पाटील अर्थात अश्विनी एकबोटे, ‘दुर्वा’, (पुणे)