आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनच्या टीव्हीवर मराठी मालिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीव्ही मालिका जगभर दाखवल्या जातात आणि प्रत्येक देशात मालिकांच्या चाहत्यांचा एक वर्ग असतोच. भारतात आणि महाराष्ट्रात मालिका या अनेकांच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. जगातील काही सर्वोत्तम मालिकांची निवड करून एक विशेष मालिका इंग्लंडमधील ‘चॅनल फोर’ या वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा मान दोन मराठी मालिकांना मिळाला आहे. आदेश बांदेकर यांची ‘होम मिनिस्टर’ आणि ऊर्मिला मातोंडकर परीक्षक असलेल्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या मालिकांचा यात समावेश करण्यात आला आहे.

‘द ग्रेटेस्ट शोज ऑन द अर्थ’ असे या मालिकेचे नाव असून या मालिकेत जगातील अनेक उत्तमोत्तम मालिका दाखवण्यात येणार आहेत. ब्रिटनच्या आरडीएफ टेलिव्हिजन या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. ‘चॅनल फोर’ ही इंग्लंडमधील विभागीय वाहिन्यांपैकी एक महत्त्वाची वाहिनी आहे. तिचे कार्यक्रम संपूर्ण इंग्लंडभर पाहिले जातात.‘होम मिनिस्टर’आणि ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या दोन्ही मालिकांची निवड दर्जा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या निकषांवर करण्यात आली आहे. होम मिनिस्टरसारखा कार्यक्रम तर ब्रिटनमध्ये नाहीच. त्यामुळे हा कार्यक्रम या मालिकेत निवडण्यात आल्यामुळे आनंद झाल्याचे मत आरडीएफ वाहिनीच्या प्रमुख अधिका-यानी व्यक्त केले आहे.

आदेश बांदेकर ‘ब्रँड’
दोन्ही मालिकांनी महाराष्ट्रात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. आदेशने ‘होम मिनिस्टर’ हा एक ब्रँडच निर्माण केला आहे. त्याच्या प्रामाणिक सादरीकरणावर व अनेक कुटुंबांशी साधलेल्या विनम्र संवादावर सारेच फिदा आहेत. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या मालिकेत विविध नृत्ये सादर केली जातात. अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर या शोची परीक्षक आहे. यातील नृत्याविष्कारांचा दर्जा उत्तम असल्याने या कार्यक्रमाला मालिकेत स्थान दिले आहे.