आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Theatre And TV Actress Supriya Pathare Claimed She Was Kidnapping

\'फू बाई फू\'ची ही अभिनेत्री तीन महिने होती निर्मात्याच्या कैदेत, बाळासाहेबांनी केली सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'फू बाई फू' फेम मराठी हास्य कलाकार आणि चित्रपट अभिनेत्री सुप्रिया पाठारेला कैद करुन तिच्याकडून एका निर्मात्याने बंदुकीचा धाक दाखवून तीन महिने अभिनय करुन घेतला होता. हा खळबळजनक खुलासा स्वतः सुप्रियाने एका कार्यक्रमात केला आहे. निर्मात्याने कैद करुन ठेवल्यानंतर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे सुटका झाल्याचे तिने सांगितले आहे.
ठाण्यात आयोजित 'महिला सुरक्षा परिसंवादा'त सुप्रिया पाठारे हिने हा खळबळजनक आरोप केला आहे. मात्र, कोणत्या निर्मात्याने तिला डांबून ठेवले आणि कुठे नेले होते याबद्दल तिने मौन पाळले आहे.

तिने सांगितले, '1995 मध्ये एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी निर्मात्याने मला राजस्थानात नेले होते. तिथे तीन महिने मी अक्षरशः कैदेत होते. मला कोणासोबतही बोलू दिले जात नव्हते.'
सुप्रियाने सांगितले, 'मुंबईतून मी एकटीच होते. निर्मात्याने तीन महिने माझ्याकडून बंदूकीच्या धाकावर अभिनय करुन घेतला. काम झाल्यानंतर मला डांबून ठेवले जात होते. मला कोणासोबत बोलण्याची मुभा नव्हती मात्र, कुटुंबियांसोबत फोनवर बोलू दिले जात होते.'
सुप्रिया कुटुबियांसोबत फोनवर बोलत असताना तिच्यावर नजर ठेवली जात असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, की मला हिंदीमध्येच बोलण्यास सांगत होते. एकदा मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला समजेल अशा सांकेतिक भाषेत मी कैदेत असल्याची माहिती दिली. माझ्या कुटुंबियांनी माझ्या सुटकेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंकडे मदत मागितली. बाळासाहेबांच्या सांगण्यावरुनची राजस्थान पोलिसांनी माझा शोध घेतला होता.
सु्प्रिया तिच्या सुटकेची माहिती देताना म्हणाली, 'राजस्थान पोलिस माझा शोध घेत आले. जवळपास 50 पोलिसांचे पथक होते. माझी सुटका झाल्यानंतर कळाले की या प्रकरणात बाळासाहेब ठाकरेंनी लक्ष घातले होते. मी तेथून 20 तासांचा प्रवास करुन सुरतला पोहोचले तेव्हा माझ्याकडे फक्त 12 रुपये होते.' सुप्रियाने तिच्या सुटकेचे सगळे श्रेय बाळासाहेबांना दिले. ती म्हणाली मी कायम त्यांच्या ऋणात राहिन. त्यासोबत तिने महिला आणि मुलींना कोणतेही संकट आले तरी घाबरून जाऊ नका असा सल्ला दिला.