Home »Marathi Katta» Mumbai Pune Mumbai Sequel Coming Soon

'मुंबई पुणे मुंबई 2'चे शुटिंग लवकरच होणार सुरु

दिव्य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 17:13 PM IST

  • 'मुंबई पुणे मुंबई 2'चे शुटिंग लवकरच होणार सुरु

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी केली होती. दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या 'मुंबई पुणे मुंबई' या सिनेमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमातील स्वप्नील आणि मुक्ताची हळुवार प्रेमकहाणी प्रेक्षकांच्या पसंतीला पडली होती. त्यामुळे या सिनेमाच्या दुस-या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या ब-याच दिवसांपासून सिनेमाचा दुसरा भाग येणार येणार अशीच चर्चा होती. मात्र आता प्रेक्षकांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण यावर्षी 'मुंबई पुणे मुंबई'च्या दुस-या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे समजते. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांनी सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यामातून ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

एक मुलगा आणि एक मुलगी भेटतात. भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये सुरू होतो मजेशीर क्षणांचा हळूवार प्रवास... अशी एक प्रेमकथा सतीशने 'मुंबई-पुणे-मुंबई'मध्ये मांडली होती. ही एका दिवसाची गोष्ट होती. दुस-या भागाची कथा पहिला भाग जेथे संपतो तेथून सुरू होणार आहे. अनेक नवीन कलाकार सिनेमाच्या दुस-या भागात दिसणार असल्याची चर्चा आहे. एकंदरीत स्वप्नील-मुक्ताचा 'मुंबई पुणे मुंबई'चा पुढचा प्रवास प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार अशी आशा व्यक्त करुया.

Next Article

Recommended