आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाविन्यपूर्ण श्रवणीय संगीताने नटलेल्या 'अनवट'चे म्युझिक लाँच, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी सिनेजगतात थरारपट तसे सातत्याने बनवले जात नाहीत. एक एक पदर उलगडून गुंगवून टाकणारा असा सिनेमा गेल्या बरेच दिवसांत पहायला मिळाला नाही. पी.एस.जे एन्टरटेन्मेंट निर्मिती संस्थेअंतर्गत पूजा शेखर ज्योती या तरुणीने 'अनवट' या सिनेमाची निर्मिती केली असून, 'अनवट' हा पहिला 4 के फॉरमॅट मध्ये प्रदर्शित होणारा सिनेमा आहे. नुकताच मुंबई येथे या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि म्युझिक लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, शंकर-एहसान-लॉय, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, निर्माते शेखर ज्योती आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटाने पहिल्यांदाच मराठीतील गाजलेल्या भावगीतांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाने अनोखा साज चढविला आहे. 'तरुण आहे रात्र अजुनी' आणि 'ये रे घना' ही गाजलेली भावगीते आपल्याला 'अनवट' सिनेमात पाहता येणार आहेत.
'तरुण आहे रात्र अजुनी'… हे माझे अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी असे एक गाणे असून नवी पिढी व सध्याच्या संगीताचा ट्रेंड लक्षात घेऊन अत्यंत सुंदर पद्धतीने आम्ही पुनर्निर्मिती करू शकलो याचा आनंद मला आहे. ही दोन्ही भावगीते रसिकांना नक्कीच आवडीतील आणि प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच अधिराज्य करतील असे शंकर महादेवन यांनी याप्रसंगी सांगितले .
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी 1975च्या काळातील कोकण, गोवा, हैदराबाद येथील पार्श्वभूमीवर आधारित असा हा 'अनवट' सिनेमा तयार केला आहे. सशक्त कथेला उत्तम दिग्दर्शनाची साथ मिळाल्यामुळे एक जबरदस्त असा थरारक अनुभव या सिनेमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिनेमातील लोकेशन्स ही नयनरम्य अशी आहेत.
या सिनेमाचे वैशिष्टय म्हणजे मराठीत पहिल्यांदाच 4 के फॉरमॅट मध्ये दाखविला जाणारा 'अनवट' हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. भारतात 2के, 3के असे फॉरमॅट वापरले जातात परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमागृहांमध्ये 4के फॉरमॅट वापरला जातो.

'अनवट' सिनेमात अभिनेता मकरंद अनासपुरे, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर हे मुख्य भूमिकेत असून किशोर कदम, भार्गवी चिरमुले, विभावरी देशपांडे, अनुश्री जुन्नेरकर आणि नयना मुके यांच्या ही महत्वपूर्ण भूमिका पहायला मिळणार आहेत. कृष्णा सोरेन या एफटीआयच्या विद्यार्थाने या सिनेमाचे कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. सरकार, भूत फेम अमर मोहिले यांनी या सिनेमाच्या पार्श्वसंगीताची धुरा सांभाळली आहे. 'अनवट' हा सिनेमा येत्या 25 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अनवटच्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...