आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगितिक सोहळ्यात \'रमा माधव\'चे म्युझिक लाँच, मंचावर अवतरली पेशवाई, पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('रमा माधव' या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात क्लिक झालेली छायाचित्रे)

सुधीर मोघे आणि आनंद मोडक या प्रतिभासंपन्न कलाकारांच्या हृद्य आठवणी आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सुरावटींनी सारं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं, निमित्त होतं 'रमा माधव' या बहुचर्चित सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्याचं. या सोहळ्याला पेशवाईच अवतरली होती. चित्रपटातील सारे कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिकपट रसिकांना उलगडून दाखवला.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांच्या हस्ते ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. गीतकार वैभव जोशी व संगीतकार नरेंद्र भिडे यांनी यावेळी ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे व संगीतकार आनंद मोडक यांच्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक गीतांची मांडणी त्यात केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग याचे अनुभव सांगितले.

'शिवम जेमिन एंटरप्राइझ प्रा. लि.' प्रस्तुत 'रमा माधव' मध्ये एकूण पाच गाणी आहेत. मराठी संगीत जगतातील लोकप्रिय जोडी ज्येष्ठ गीतकार सुधीर मोघे व संगीतकार आनंद मोडक यांच्या अवीट गोडीच्या गीत - संगीताचा आस्वाद या चित्रपटाच्या गाण्यातून घेता येणार आहे. सुधीर मोघे व आनंद मोडक यांचे एकत्र काम असलेला हा शेवटचा चित्रपट ठरला आहे. तसेच गीतकार वैभव जोशी आणि संगीत संयोजक नरेंद्र भिडे यांचे गीत-संगीत ही या चित्रपटातून ऐकायला मिळणार आहे.

यातील 'हमामा रे पोरा' या संत ज्ञानेश्वरांच्या दोन ओळींच्या रचनेला सुधीर मोघे यांनी सुंदर शब्दांत बालगीतात गुंफले असून त्यात लोकसंगीताचा वापर केला आहे. हे बालगीत शरयू दाते आणि आर्या आंबेकर यांनी गायले आहे. मंगळागौरीच्या सोहळ्यावर आधारित मेधा परांजपे, कीर्ती पाठक, मंजिरी जोशी, दुर्वा बागवे यांनी गायलेले 'झुणूक झुणूक'' या गीतात पारंपरिक ताल वाद्यांचा वापर अप्रतिमरित्या करण्यात आला आहे. 'रमा माधव' चित्रपटात 'लुट लियो मोहे श्यामसावरे' या मुज-याला मधुरा दातार यांचा मादक स्वरसाज असून अदिती राव हैदरी हिच्या अदा प्रेक्षकांना पाहायला मिळतील. 'स्वप्नीही नव्हते दिसले..' हे ऋषिकेश रानडे आणि प्रियांका बर्वे यांच्या मधाळ स्वरातलं प्रेमगीत याशिवाय वैशिष्ट्य म्हणजे शंकर महादेवन यांनी गायलेली पारंपरिक गणपतीच्या आरतीचाही चित्रपटात समावेश आहे.

या सांगतिक सोहळ्याचे सूत्रसंचलन डॉ.निलेश साबळे यांनी केलं. व्हिडिओ पॅलेसने प्रकशित केलेल्या 'रमा माधव'च्या ध्वनिफीतीतून सुरेल गीतांची मेजवानी रसिकांना घेता आली. अलोक राजवाडे, पर्ण पेठे या फ्रेश जोडीसोबत रवींद्र मंकणी, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, अमोल कोल्हे, सुचित्रा बांदेकर, सोनाली कुलकर्णी, श्रृती मराठे आणि श्रृती कार्लेकर यांच्या भूमिका असलेला. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' 8 ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या चित्रपटाच्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे...