मुंबई - रविंद्रनाथ टागोर यांच्या 'दृष्टीदान' या कथेवरुन प्रेरित असलेल्या 'तप्तपदी' या आगामी मराठी सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा बुधवारी थाटात पार पडला. मुंबईतील द लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शक सचिन बळीराम नागरमोजे यांच्या आईवडिलांच्या हस्ते सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले.
संगीताच्या तालावर कलाकारांच्या परफॉर्म्सनपासून ते गीतकारांच्या कविता वाचनापर्यंत सर्वच बाबतीत 'तप्तपदी'चा म्युझिक लाँच सोहळा बॉलिवूडच्या ताकदीचा ठरला.
या सिनेमात मेन लीडमध्ये असलेल्या कश्यप परुळेकर, वीणा जामकर आणि श्रुती मराठे यांनी 'अशी ये नजीक...' आणि 'हुल देऊन गेला पाऊस...' या दोन गीतांवर बहारदार नृत्य सादर करुन सोहळ्यात रंग भरले. सावनी शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांनी या गीतांना स्वरसाज चढवला आहे. गीतकार वैभव जोशींच्या आवाजातील कविता वाचन काव्यप्रेमींची दाद मिळविण्यात यशस्वी ठरले.
या सिनेमाची कथा जरी जुन्या काळातील असली तरी सिनेमाची पटकथा लिहिताना आजच्या समाजाला अनुरुप असलेले योग्य ते बदल करण्यात आले असल्याचे दिग्दर्शक सचिन बळीराम नागरगोजे यांनी सांगितले. मानवी नातेसंबंध, भावभावना, वास्तवता आणि या सगळ्यातील संघर्ष चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला असल्याचेही सचिन म्हणाले.
कश्यप परुळेकर, वीणा जामकर आणि श्रुती मराठे या आघाडीच्या कलाकारांसोबत नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे, अंबरिश देशपांडे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'तप्तपदी'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि तुम्ही स्वतः पाहा कसा थाटात पार पडला हा सोहळा...