आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे/मुंबई - साठाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेने पुन्हा मराठीचेच 'कवतिक' गायले. या यशानंतर कलाकार आणि रसिकजनांनी 'मराठीचे बोलू कवतिके' अशी भावना व्यक्त केली. 'दिव्य मराठी'शी बोलताना उषा जाधव, मंगेश हाडवळे आदींनी आपल्या भावनांना शब्दरूप दिले ..
स्ट्रगल संपले आणि करिअरला खरी सुरुवात: उषा जाधव - 'धग'मधील माझी भूमिका अत्यंत वेगळ्या धाटणीची होती. यानिमित्ताने ग्रामीण जीवनाच्या जवळ जाता आले. अमिताभ बच्चन, सई परांजपे यांनी अभिनयासाठी माझी पाठ थोपटली तेव्हा मला बक्षीस मिळाल्याचा आनंद झाला. या पुरस्काराने माझे स्ट्रगल संपले आणि करिअरला खरी सुरुवात झाली, असे म्हणता येईल.
दुसरा राष्ट्रीय पुरस्कार- आरती अंकलेकर- हा माझा पार्श्वगायिका म्हणून मिळालेला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. मी मुळात शास्त्रीय संगीत गायिका आहे. मी नित्यनेमाने सुगम संगीत गाणारी गायिका नाही. अगदी मोजकीच गाणी आमच्या वाट्याला येतात. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा याचे अप्रूप अधिक वाटते.
'धग'च्या आशयाला यश मिळाल्याची पावती- शिवाजी पाटील- या राष्ट्रीय पुरस्कारामुळे 'धग'मधील आशय प्रादेशिकतेपलीकडे जाऊन पोहोचल्याची पावती मिळाली आहे. याचे समाधान व आनंद खूप मोठा आहे. चित्रपटांनी केवळ करमणुकीच्या पलीकडे जाऊन काही संदेश द्यावा, असे मला नेहमी वाटते. मी सुरवातीच्या 'वावटळ' या चित्रपटातूनही असाच प्रयत्न केला होता. 'धग'चे सर्व चित्रीकरण मी माझ्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळ केले होते.
'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांना आठ पुरस्कार- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आठ पुरस्कार पटकावले. विक्रांत पवार दिग्दर्शित 'कातळ' फिल्मने नॉन फिक्शन गटात रजत कमळ व 50 हजारांचे पारितोषिक मिळवले. याच चित्रपटासाठी दिग्दर्शक विक्रांतला 1.5 लाखांचे पारितोषिक, सुवर्णकमळ मिळाले. कॅमेरामन अभिमन्यू डांगेलाही पुरस्कार मिळाला. 'आफ्टर ग्लो'ला बेस्ट फिल्मचा सन्मान मिळाला. 'अल्लाह इझ ग्रेट' फिल्मला लक्षवेधक कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला आहे.
श्रमाचे फळ, प्रेक्षकांची पसंती मिळावी- मंगेश हाडवळे- मेहनतीचे फळ मिळाले असे वाटते. चांगल्या चित्रपटाची नोंद राष्ट्रीय पुरस्काराने घेतली जात आहे, याचा आनंद वाटतो. आता प्रेक्षकांच्या पसंतीची मोहरदेखील या बाल चित्रपटावर उमटावी, ही अपेक्षा आहे.
जिद्दीचेच फळ : शैलेंद्र बर्वे- एकांकिका, नाटके, मालिका, चित्रपट या प्रत्येक ठिकाणी तेवढय़ाच जिद्दीने काम केल्यामुळेच राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकला. हे आतापर्यंतच्या कामाचे फळ मिळाल्यासारखे वाटते. 'संहिता'चे संगीत वेगळ्या धाटणीचे होते. 1937 चे संगीत उभे करण्याचे आव्हान सुमित्रा भावे व सुनील सुकथनकर यांनी माझ्यापुढे ठेवले. आम्ही हे आव्हान योग्य पद्धतीने पार पाडले. ठुमरी, गझल हा प्रकार या संगीतात असल्याने हा माझ्यासाठीही चांगला अनुभव होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.