आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई टीव्हीवर 11 जुलैपासून 'तू माझा सांगाती', चिन्मय मांडलेकर संत तुकारामांच्या भूमिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत तुकाराम हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, तुकाराम गाथा मराठीजनांचे प्रेरणास्थान. 1936 ला प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम चित्रपटाची निर्मिती करत त्यांच्या आयुष्याचे पैलू उलगडले, तर तीन वर्षांपूर्वी चंद्रकांत कुलकर्णी यांनीही तुकारामांचे चित्रण सर्वांपुढे आणले. मात्र, फक्त तीन तासांच्या कालावधीत तुकारामांचे आयुष्य उलगडणे केवळ अशक्य. यामुळेच 'तु माझा सांगाती' या ऐतिहासिक मालिकेची निर्मिती ई टीव्हीने केली आहे. चिन्मय मांडलेकर तुकारामांच्या भूमिकेत भेटीस येणार आहे.
संत तुकाराम आणि पत्नी जिजाबाई यांच्या सहजीवनातील अनेक प्रसंग यातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 11 जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता प्रसारीत होणारी मालिका पाहणे विलक्षण अनुभव ठरणार आहे.
या मालिकेविषयी अधिक माहिती देताना व्हायाकॉम 18 चे कार्यकारी उपाध्यक्ष आणि ई टीव्हीचे व्यवसाय मुख्य अनुज पोद्दार म्हणाले की, आम्ही नेहमीच वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न करतो. जनमाणसाच्या मनात आदराचे स्थान असलेल्या संत तुकारामांचे आयुष्य मोठय़ा पडद्यावर उलगडले गेले आहे, मात्र वेळेच्या मर्यादा येतात. ही मालिका विशेष रूपात आम्ही करायला घेतली. प्रेक्षकांशी भावनिक आणि अतूट नाते ही मालिका निर्माण करेल, असा माझा विश्वास आहे.
कंटेंट हेड संजय उपाध्याय म्हणाले, भक्तिमार्गाप्रमाणेच सहचारिणी आवलीचे अनन्यसाधारण असे स्थान त्यांच्या जीवनात होते. तिचा भांडकुदळ असण्याचा एकच पैलू प्रेक्षकांना माहिती आहे, याशिवायही तिचे काही वेगळे दर्शन मालिकेतून घडणार आहे.