'रंगभूमी ही नेहमीच माझ्या अत्यंत जवळची राहिली आहे. तिचे माझ्या हृदयात स्थान आहे.' असे नेहमी म्हणणारे अभिनेते विनय आपटे यांच्या गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निधनानंतरचा त्यांचा वाढदिवस रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या 'विनय. एक वादळ' या अनोख्या कार्यक्रमात मराठी कलाकारांनी साजरा केला. कुठेही श्रद्धांजलीचे स्वरूप येऊ न देता आपटे यांनी दिग्दर्शित व अभिनीत विविध नाटकांतील प्रवेशांच्या सादरीकरणासह त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
रुईया महाविद्यालयात एकांकिकांच्या दिग्दर्शनापासून आपटे यांनी सुरुवात केल्यानंतर त्यांच्या दिग्दर्शन शाळेत घडलेले चित्रपट निर्माते श्रीरंग गोडबोले, संजय जाधव आदींसह दिलीप प्रभावळकरांसारख्या ज्येष्ठ कलाकारांनी दृकश्राव्य चित्रफितीद्वारे आपटेंचे पैलू उलगडले. अफलातून या नाटकातून काम करणार्या सुनील बर्वे, अतुल परचुरे, दिलीप गुजर आणि ऋषी देशपांडे यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाबरोबरच आपटे यांनी कलाकारांची किती काळजी घेतली याबाबत अनुभव कथन केले. 'कुसुम मनोहर लेले', 'एक लफडं' या नाटकांतून आपटे यांचा सहवास लाभलेले सुकन्या कुलकर्णी, संजय मोने, गिरीश ओक, चिन्मय मांडलेगर, अदिती सारंगधर यांनी त्यातील भावनाशील प्रसंग साकारले.