आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूकीच्या रिंगणात 'आता होऊ दया खर्च' चा सूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीचे वारे जोरदार वाह्तायेत. जिंकण्याच्या इर्षेने प्रत्येकजण आश्वासनांची बरसात करताहेत. याच पाश्वभूमीवर 'आता होऊ दया खर्च' असं म्हणत गायिका रेश्मा सोनावणे नेत्यांना त्यांच्या कामाची आठवण करून देणार आहे. आगामी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमातून गायिका रेश्मा सोनावणेने 'आता होऊ दया खर्च' हे ठसकेदार गाणं गायलं आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोट ठेवणारं हे ठसकेदार गाणं अरविंद जगताप यांनी लिहिलं असून शशांक पोवार यांनी या गाण्याला अप्रतिम संगीत दिलं आहे. या गाण्यातून नेत्यांची कानउघडणी गमतीशीरपणे करण्यात आली आहे.
नुकतंच या गाण्याचं गीतध्वनीमुद्रण संपन्न झालं. रेकॉर्डिंगच्या वेळी या सिनेमातील कलाकार सयाजी शिंदे स्वतः आवर्जून उपस्थित होते. 'रिक्षावाला', 'साजूक तुपातील' या गाण्यांच्या यशानंतर रेश्मा सोनावणे आपल्या या गाण्याबद्दलही तितकीच उत्सुक आहे. सयाजी शिंदे यांनी रेश्माच्या गाण्याला दिलेली दाद ही तिच्यासाठी अमुल्य असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली.
'सिद्धिविनायक इंटरनॅशनल फिल्म्स' निर्मिती संस्थेचे निर्माते नविन सिंग आणि राकेश भोसले यांनी या सिनेमाच्या निर्मितीची तर दिग्दर्शनाची धुरा बाळकृष्ण शिंदे यांनी सांभाळली आहे.
2009मध्ये रुपेरी पडद्यावर आलेल्या 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' या गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल निवडणुकीच्या रणधुमाळीत धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. नारायण वाघ आणि विश्वासराव टोपे या नेत्यांच्या पारंपारिक राजकीय शत्रुत्वाची कथा 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या सिनेमातून रंगणार आहे.
मकरंद अनासपुरे आणि सयाजी शिंदे यांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमातून ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार रंगनाथ पठारे प्रथमच या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेत दिसतील. सोबत डॉ. विलास उजवलणे, शरद शेलार, डॉ.सुधीर निकम, सिद्धेश्वर झाडबुक्के, स्वप्नील राजशेखर, पुर्णिमा अहिरे, विनोद खेडकर आणि परदेशी अभिनेत्री सेरेना यांच्या भूमिका आहेत. सध्याच्या राजकारणाचं खुमासदार चित्रण आगामी 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' द्वारे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.