मोहनजोदडोचे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील अवशेष आहेत. मृतदेहांच्या टेकड्या, असा याचा अर्थ आहे.
सर्व तर्क-वितर्क आणि अफवांना दूर सारत निर्माता-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरने ‘मोहनजोदडो’चे शुटिंग लवकरच सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. या विषयावर आशुतोष 2011 पासून संशोधन करत आहे. या सिनेमात हृतिक रोशन असून ही प्राचीन प्रेमकथा आहे. इ.स.पूर्व 26व्या शतकातील सिंधू खोर्यातील सर्वात मोठी आणि आधुनिक वस्ती (आता सिंध, पाकिस्तानात आहे) म्हणून शालेय अभ्यासक्रमात मोहेनजोदडोचा अभ्यास केला जात होता. मात्र, आता हीच संस्कृती बॉलीवूडमध्ये मोठय़ा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘दिव्य मराठी’सोबत केलेल्या खास चर्चेत आशुतोष गोवारीकर म्हणाले की, मोहनजोदडोच्या बाबतीत शालेय अभ्यासक्रमात खूप संक्षिप्त स्वरूपात म्हणजेच तेव्हाची संस्कृती, व्यवसाय, खान-पान आणि समाजाच्या बाबतीत शिकवले जात होते. हा विषय मला नेहमीच आकर्षित करत होता.
गेल्या साडेतीन वर्षांपासून मी आणि माझी टीम पुस्तकांद्वारे आणि इतिहास संशोधकांशी चर्चा करून सिंधू खोर्याच्या संस्कृतीची अधिकाधिक माहिती गोळा करत आहोत. त्यानंतर त्याचे संहितेत रूपांतर करणे, हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर होते. आशुतोषने सांगितले की, ‘ज्याप्रमाणे माझ्या ‘जोधा अकबर’ सिनेमात अकबरचा राज्य कारभार आणि त्याचे कौशल्य दाखवण्यात आले, पण केंद्रस्थानी प्रेमकथा होती, अगदी त्याचप्रमाणे मोहनजोदडो संस्कृती प्रेमकथेच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे.’
हृतिकसोबत कोणती अभिनेत्री काम करणार, हे अद्याप निश्चित झाले नसले, तरी तीन प्रस्थापित आणि एका नवीन अभिनेत्रीच्या नावाचा विचार सुरू आहे. हृतिक आपल्या ‘बॅँग बॅँग’च्या शुटिंग आणि डबिंगनंतर ‘मोहनजोदडो’शी जोडला जाईल. आशुतोषसमोर चित्रपटाची कथा तयार करणे, हे पहिले आव्हान होते, जे त्याने पारही केले आहे. आता 90 दिवसांपेक्षा जास्त शूटिंग करता येईल, असे गाव वसवणे, हे आशुतोषसमोर दुसरे मोठे आव्हान असेल.
या प्रोजेक्टबाबत हृतिक रोशन म्हणतो, 'आशुतोष आणि मी पुन्हा एकत्र येत आहोत. ‘मोहनजोदडो’ हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीची पार्श्वभूमीवरील प्रेमकथा आहे. सिंधू खोरे संस्कृती भारतीय आहे, पण ही संस्कृती संपूर्ण जगासाठी कुतूहलाचा विषय राहिली. प्राचीन भारत आम्ही प्रेमकथेच्या माध्यमातून दाखवणार आहोत. आशुतोषसोबत पुन्हा काम करणे, हा सर्वात मोठा रोमांच आहे.'