आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये नव्हे, सैन्यात भरती होण्याची होती नंदा यांची इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या काळातील प्रख्यात अभिनेत्री बेबी नंदा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 70 सिनेमांमध्ये अभिनय केला.
बालकलाकाराच्या रुपात अभिनयाला सुरुवात...
नंदा यांचा 8 जानेवारी 1939 रोजी मुंबईत जन्म झाला. प्रख्यात अभिनेते मास्टर विनायक हे त्यांचे होते. बाल कलाकार म्हणून नंदा यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले होते. विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी बाल कलाकार म्हणून काम करण्यास नकार दिल्याने नंदा यांचा रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला होता. बेबी नंदा या नावाने त्यांनी सुरुवात केली आणि शेवटपर्यंत त्यांना बेबी नंदा म्हणूनच ओळखले जात होते.
तरुणपणीचे 'जब जब फूल खिले', 'तीन देवियां', 'दी ट्रेन', 'भाभी', 'काला बाजार', 'धूल का फूल', 'छोटी बहन', 'हम दोनों', 'गुमनाम' या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. त्यांचे सर्व सिनेमे खूप गाजले. सिल्व्हर स्क्रिनवर नंदा यांची जोडी शशी कपूर यांच्यासह खूप गाजली. या दोघांनी एकूण आठ सिनेमांत एकत्र काम केले होते. नंदा यांचे नाव पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. 'आंचल' या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
1972 मध्ये रिलीज झालेला 'शोर' हा नंदा यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून शेवटचा हिट सिनेमा होता. या सिनेमात त्यांनी मनोज कुमार यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. नंदा यांनी 1983 मध्ये राज कपूर यांच्या 'प्रेमरोग'मध्ये शेवटची भूमिका केली होती. त्यानंतर मात्र त्या रुपेरी पडद्यापासून आणि फिल्मी समारंभापासून दूरच होत्या.
सैन्यात भरती होण्याची होती इच्छा...
नंदा यांना अभिनयात रस नव्हता. त्यांना सैन्यात भरती व्हायचे होते. पण वडिलांच्या इच्छेमुळे त्या अभिनय क्षेत्रात आल्या. 1946 मध्ये 'मंदिर' सिनेमात त्यांनी मुलाच्या भूमिकेतून रुपेरी पडद्यावर प्रवेश केला, त्यानंतर जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगदगुरू इत्यादी चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी नायिका आणि सहनायिका म्हणून बहीण, पत्नी, आई, खलनायिका अशा विविध भूमिका साकारल्या.
मामांनी दिला पहिला मोठा ब्रेक...
नंदा यांचे मामा व्ही. शांताराम यांनी नंदा यांना ‘तुफान और दिया’ या हिंदी सिनेमातून सर्वप्रथम नायिका म्हणून संधी दिली. हा सिनेमा सिल्व्हर ज्युबिली झाला होता. जब, जब फुल खिले, शोर, छोटी बहन, कालाबाजार, लक्ष्मी, बंदी, दुल्हन, भाभी, धूल का फूल, आंचल, इत्तेफाक हे त्यांचे अन्य गाजलेले चित्रपट. आंचलसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
मराठीतही संस्मरणीय भूमिका...
नंदा यांनी बाराव्या वर्षी दिनकर पाटील यांच्या कुलदैवत या मराठी चित्रपटात काम केले. यानंतर त्यांनी शेवग्याच्या शेंगा, देव जागा आहे, देवघर, झालं गेलं विसरुन जा आणि हंसा वाडकर यांच्याबरोबर मातेविना बाळ चित्रपटात काम केले होते. शेवग्याच्या शेंगामध्ये नंदा यांनी साकारलेल्या बहिणीच्या भूमिकेसाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले होते.
आयुष्यभर अविवाहित राहिल्या...
प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी त्यांचा साखरपुडा झाला होता. पण मनमोहन देसाई यांचे निधन झाल्यानंतर त्या एकट्याच राहू लागल्या. मराठी दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी हे त्यांचे भाऊ आहेत. जयश्री हे त्यांच्या वहिनीचे नाव आहे.
सार्वजनिक जीवनापासून राहिल्या दूर...
सिनेसृष्टीपासून संन्यास घेतल्यानंतर नंदा आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाच भेटायच्या. वहिदा रहमान, हेलन आणि साधन या त्यांच्या जवळच्या मैत्रीणी होत्या. सार्वजनिक जीवनापासून अलीकडे त्या दूरच होत्या. सार्वजनिक ठिकाणी त्या सहसा हजेरी लावत नव्हत्या. मात्र 2010मध्ये 'नटरंग' या मराठी सिनेमाच्या प्रीमिअरवेळी त्या वहिदा रहमान, हेलन आणि साधना यांच्यासह दिसल्या होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा नंदा यांची खास छायाचित्रे...