आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Rakhandar Marathi Movie Released On Friday Across Maharashtra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध, ‘राखणदार’ राज्यभरात प्रदर्शित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवाच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही, इथपासून जगात खरंच देव आहे का, इथपर्यंत वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्या अवतीभवती बघायला मिळतात. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर या न्यायाने देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागणारे नास्तिक असोत वा हवा जशी दिसत नाही, पण ती असते, तसाच देवही दिसत नाही, पण तो असतो, असं मानणारे आस्तिक असोत, दोघेही आपापल्या जागी योग्यच असतात. पण या प्रश्नांच्या गुंत्यापलिकडे जात एका प्रेमकथेच्या माध्यमातून देवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा अनोखा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ या चित्रपटातून केला आहे.
‘कगार’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती आणि ‘मंथन एक अमृत प्याला’ या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण केल्यानंतर डॅा. मृणालिनी पाटील यांनी ‘राखणदार’ची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते चित्रपटाच्या संगीताचं अतिशय थाटात अनावरण मुंबईत करण्यात आलं. त्याप्रसंगी चित्रपटातले प्रमुख कलावंत तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलरचंही अनावरण करण्यात आलं.
सदानंद हा एक अतिशय साधा आणि प्रामाणिक मुलगा त्याच्या साधेपणामुळेच वारंवार अडचणीत सापडतो. अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्गही त्याला गवसतात. पण प्रत्येक टप्प्यावर त्याच्याही नकळत एक दैवी शक्ती त्याला मदत करत असते. अर्थात तो तिला ओळखण्यात कमी पडतो. ती दैवी शक्ती वेळोवेळी त्याची सत्वपरीक्षाही घेते. अखेरीस सदानंदला या दैवी शक्तीची प्रचीती येते का, देवाला ओळखण्यात तो यशस्वी ठरतो का, हे ‘राखणदार’मध्ये बघायला मिळणार आहे.
आपण आयुष्यभर देव, देव करत राहातो, मंदिरांमध्ये देवाचा शोध घेत राहातो, पण अवचितपणे समोर येऊन उभ्या ठाकलेल्या देवाला ओळखण्यात मात्र कमी पडतो, हे ‘राखणदार’चं सूत्र आहे. अजिंक्य देव, जीतेंद्र जोशी, अनुजा साठे यांच्या प्रमुख भूमिका असून यतीन कार्येकर, सतीश पुळेकर, रवींद्र महाजनी, हंसराज जगताप आणि अनुप चौधरी यांनी त्यांना भक्कम साथ दिली आहे. आनंद मोरे लिखित या चित्रपटाचं छायालेखन जहांगीर चौधरी यांनी केलं असून फ. मु. शिंदे आणि प्रकाश राणे लिखित गीतांना कनकराज आणि समीर फातर्पेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे.
‘राखणदार’ २६ सप्टेंबर रोजी राज्यभरात प्रदर्शित झाला आहे.