आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रितेशच्या 'लय भारी'त सलमानने स्वतः केली होती भूमिकेची डिमांड, जाणून घ्या याविषयी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - रितेश देशमुख आणि सलमान खान)
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख 'लय भारी' या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'लय भारी' हा सिनेमा पुढील आठवड्यात 11 जुलै रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय. रितेश देशमुख या सिनेमाचा आकर्षणबिंदू आहे. मात्र रितेशसोबतच आणखी एक अभिनेता या सिनेमाचे आकर्षण ठरला आहे. तो अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खान होय. या सिनेमात सलमान खान एका छोटेखानी भूमिकेत झळकणार असून पहिल्यांदाच मराठी सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमात सलमान चक्क मराठीत बोलताना दिसणार आहे.
'लय भारी'मधील ही भूमिका सलमान खानने स्वतःहून मागितली असल्याचे अभिनेता रितेश देशमुखने उघड केले. पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत रितेशने ही गोष्ट उघड केली. वास्तविक पाहता कथेमध्ये सलमानसाठी काही संवाद किंवा सीनची तरतूद नव्हतीच. पण त्याचा आग्रह असल्यामुळे दिग्दर्शक निशिकांत कामत आणि मी त्याच्यासाठी एक प्रसंग तयार केला, असे रितेश म्हणाला. रितेश पुढे म्हणाला, की सलमानला सिनेमात आणखी सीन्स हवे होते, त्यासाठी सीन उभे केले असते तर ते कथेला मानवले नसते त्यामुळे एक खास सीन त्याच्यासाठी तयार करण्यात आला.
रितेशने सांगितले, 'जय हो'चे चित्रीकरण रामोजी फिल्म सिटीमध्ये चालू असताना सलमानची माझी भेट झाली. त्याने विचारले येथे काय करतोस? तेव्हा मी त्याला 'लय भारी' बद्दल सांगितले. तेव्हा तो मला म्हणाला, मला पण या सिनेमात एक सीन दे. तेव्हा मला काही सुचले नाही. मग मी आणि निशिकांत कामत यांनी चर्चा केली आणि एक भूमिका त्याच्यासाठी तयार करण्यात आली.
सलमानचे 'लय भारी'मधले काम रसिकांना खूप आवडेल. धोतर, कुर्ता, टोपी अशा पेहरावातली त्याची भूमिका छान झाली आहे. खरे तर त्याने हा रोल मराठी असलेल्या आपल्या आईसाठी केला. त्याची आई जेव्हा या सिनेमातील त्याची भूमिका पाहिल तेव्हा तिलाही खूप आवडेल, असेही रितेश म्हणाला. सिनेमात सलमान दारुड्याच्या भूमिकेत असल्याचे समजते.
मराठीत नव्हे हिंदीत तयार होणार होता हा सिनेमा...
रितेशने सांगितले, 'खरे तर साजिद नाडीयाडवाला यांनी ही कथा हिंदी सिनेमासाठीच लिहिली होती आणि ते सलमान खान आणि अक्षय कुमार यांना घेवूनच हा चित्रपट करणार होते. पण याला सात-आठ वर्षे झाली. जेव्हा मध्यंतरी हा सिनेमा मराठीत करायचा विचार झाला तेव्हा सिनेमंत्रा प्रोडक्शनचे अमेय खोपकर आणि जितेंद्र ठाकरे यांनी माझी निवड केली. तेव्हा मला वाटले मराठी चित्रपटात काम करायचे असेल तर असाच दमदार सिनेमा हवा.''
ग्वाल्हेर, इंदौर, बडौदा अशा शहरात जिथे मराठी रसिक आहे तिथेसुद्धा हा सिनेमा प्रदर्शित करण्याचा आमचा मानस असल्याचे रितेशने सांगितले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा पुण्यातील पत्रकार परिषदेत क्लिक करण्यात आलेली लय भारी सिनेमातील कलाकारांची खास छायाचित्रे...
(फोटो साभार - शरद लोणकर)