मुंबई :चेन्नई एक्सप्रेस, राऊडी राठोड, द नेमसेकसारखे सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे चित्रपटनिर्माते रॉनी स्क्रुवाला आता लेखनक्षेत्रात उतरले आहेत. ‘ड्रीम विथ युवर आइज ओपन’ असे शीर्षक असलेल्या आपल्या पुस्तकाचे रॉनी लवकरच प्रकाशन करणार आहेत.
हे पुस्तक पूर्णत: चरित्रही नाही की त्यात चित्रपटाविषयीचे लेखनही नाही. या पुस्तकामध्ये व्यवसायावर आधारित लेखनाचा अंतर्भाव आहे. त्यामध्ये निर्मिती व्यवसायातल्या रोनी यांचा आतापर्यंतचा प्रवास, व्यवसायातील अनेक बाबी अशा गोष्टींवर आधारित लेखनाचा समावेश आहे. तरुण व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक ठरेल असे लेखन या पुस्तकातून व्हावे असा रॉनी यांचा हेतू असल्याने त्यानुसार त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
रॉनी युटीव्हीचे आणि स्वदेस फाऊंडेशनचे सीईओ असून 1990मध्ये त्यांनी निर्मितीक्षेत्रातआपले करिअर सुरू केले होते. फिजा, लक्ष्य, स्वदेस, लाइफ इन अ मेट्रो, दन दना दन गोल यांसारखे अनेक हिट चित्रपट त्यांनी आतापर्यंत दिले आहेत. दूरदर्शनसाठी 1981मध्ये त्यांनी केबल ऑपरेटर म्हणून सुरुवात करीत माध्यमक्षेत्रात पाऊल ठेवले होते. आता ते युटीव्हीसारख्या प्रतिष्ठित ग्रुपचे सीईओ म्हणून यशस्वी निर्मात्यापैकी एक म्हणून गणले जातात.