मुंबई: सध्या प्रिती झिंटा नेस वाडिया प्रकरणात कोर्टाच्या चकरा मारत आहे. आता तिचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘चोरी चोरी चुपके चुपके’देखील वादात सापडला आहे. सिनेमाच्या सॅटेलाइट अधिकारांच्या नूतनीकरणावरून हा सिनेमा पुन्हा एकदा न्यायालयात जाण्याच्या मार्गावर आहे.
निर्माता नाजिम रिझवी आणि भरत शाहच्या ‘चोरी चोरी चुपके चुपके’मध्ये अंडरवर्ल्डने पैसा लावल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपानंतर आपल्या एका रिसिव्हरची सिनेमासाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर कलावंतापासून वितरकांपर्यंतचा आर्थिक व्यवहार न्यायालयाच्या मध्यस्थीने झाला. हा एक असा सिनेमा होता, ज्यामध्ये
सलमान खान, प्रिती झिंटा आणि राणी मुखर्जीसारख्या मोठय़ा कलाकारांच्या मानधनाचा हिशेब देखील सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर न्यायालयाच्या रिसिव्हरने ठेवला होता. त्यानंतर सर्व आरोपांतून सिनेमाची मुक्तता करण्यात आली.
आता 13 वर्षांनंतर नरेंद्र हेडावत यांनी या सिनेमाला पुन्हा चर्चेत आणले आहे. वास्तविक, त्यांचा सिनेमाशी काहीएक संबंध नाही. मात्र ते ‘नरेंद्र हेडावत अँड कंपनी’चे मालक असून या कंपनीकडे अनेक सिनेमांचे निगेटिव्हजचे अधिकार आहेत. मूळचे राजस्थानचे असलेल्या हेडावत यांनी ‘अमर अकबर अँथनी’समवेत 200 सिनेमांचे सॅटेलाइट आणि निगेटिव्हचे अधिकार खरेदी केले आहेत. डिजिटल अधिकारांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे दर 5 वर्षांनी नूतनीकरण करण्यात येते. हेडावतांची कंपनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’चे अधिकार खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, सर्व कायदेशीर प्रक्रियेतून सिनेमाची मुक्तता झाली असतानादेखील सिनेमावर भारत शाहचा मालकी अधिकार कायम आहे.
जर हेडावतना सिनेमाचे अधिकार खरेदी करायचे असतील, तर त्यांना एकतर न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, अन्यथा शाहशी चर्चा करावी लागेल. शाह यांनी हेडावत सिनेमाच्या निगेटिव्हची खरेदी करणार्या कंपनीचे मालक असून त्यांचा या सिनेमाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. शिवाय अनेक चॅनल मालकांपुढे या दोघांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा सिनेमा न्यायालयात जाणार, असे दिसते आहे.