आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan’s Hit And Run Case Disrupts Bollywood And Bajrangi Bhaijaan

सलमान खानमुळे बॉलिवूडला धसका, निर्मात्यांना सातशे कोटींचा फटका?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या हिट अँड रन खटल्याची अंतिम सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे. या खटल्याचा निकाल विरोधात जाऊन सलमान तुरुंगात गेल्यास २०१५ - २०१६ या दोन वर्षांत बॉलिवूडचे तब्बल ७०० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्याच्या चार बिग बजेट चित्रपटांचे चित्रीकरण बाकी आहे. ते लांबल्यास बॉलिवूडला तीनशे कोटी आणि बॉक्स ऑफिसवरील सातशे कोटींचा फटका बसू शकतो, यश राज फिल्म्सबरोबर सलमान खान ‘सुलतान’ हा चित्रपट करत आहे, हा चित्रपट २०१६ च्या दरम्यान प्रदर्शित होऊ शकतो.

पुढील वर्षीच्या ईदसाठी त्यांनी हा चित्रपट भेट देण्याचे ठरवले आहे. मात्र सलमान तुरुंगात गेल्यास हा चित्रपट लांबणीवर पडून यशराजला कदाचित सलमानच्या जागी दुसरा अभिनेता घ्यावा लागेल. याशिवाय आधीपासूनच लांबणीवर पडलेला ‘नो एंट्रीमें एंट्री’ हा ‘नो एंट्री’चा सिक्वेल पुन्हा पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या सिक्वेललाही अधिकाधिक नुकसानच सहन करावे लागू शकते.

तसेच हृतिक रोशनने तारखा दिल्याने ‘शुद्धी’ या करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात सलमान नायक असणार आहे. मात्र सलमान तुरुंगात गेल्यास करण जोहरला त्याचा फटका बसू शकतो. याशिवाय त्याच्यासोबत काम करू इच्छिणार्‍या निर्मात्यांना त्यांच्या योजना बासणात गुंडाळाव्या लागतील.

ईदचा मुहूर्त साधणार की हुकणार?
‘बजरंगी भाइजान’ हा सलमान खान आणि करिना कपूर यांचा चित्रपट १७ जुलैला प्रदर्शित होतो आहे. या आठवड्यात सलमानचा आवडता मुहूर्त असणारा ईदचा सण आहे. ईदच्या काळात प्रदर्शित होणारा सलमानचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे यश मिळवत आला आहे. गेल्या वर्षी त्याच्या ‘किक’ या चित्रपटाने हा यशाचा सिलसिला कायम राखला होता. आता ‘बजरंगी भाइजान’ हा चित्रपटदेखील शंभर कोटींच्या वर व्यवसाय करू शकतो. मात्र याचदरम्यान सलमानला शिक्षा झाली तर मात्र त्याची किंमत ‘बजरंगी’ला मोजावी लागेल.