आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारेगमप : पुण्याची जुईली जोगळेकर ठरली सूर नव्या युगाचा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्या युगाच्या सूरांच्या शोधासाठी सुरु झालेला सारेगमपचा प्रवास महाअंतिम सोहळ्यात अधिकच रंगतदार बनला आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पुण्याच्या जुईली जोगळेकरने बाजी मारत ‘महागायिका’ होण्याचा सन्मान मिळवला. अतिशय उत्कंठावर्धक आणि रंजक ठरलेल्या या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांनी पाठवलेली मते आणि परिक्षकांच्या गुणांच्या आधारे विजेत्याची निवड करण्यात आली. यात विजेती ठरलेल्या जुईलीला प्रसिद्ध गायक हरिहरन यांच्या हस्ते झी मराठीच्या वतीने एक लाख रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले.
जानेवारीपासून सुरू झालेल्या सुरांच्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून 14 स्पर्धक निवडण्यात आले होते. दर आठवड्याला त्यांच्यात चुरशीची स्पर्धा रंगत गेली तसे एकेक गायक गायिका यातून बाद होत गेले. महाअंतिम सोहळ्यासाठी स्पर्धचे मान्यवर परीक्षक अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे आणि प्रेक्षकांनी पाठवलेल्या मतांच्या आधारे मुरबाडचा महेश कंटे, सोलापूरचा जयंत पानसरे, डोंबिवलीची रेश्मा कुलकर्णी, पुण्याची जुईली जोगळेकर, कोल्हापूरचा प्रल्हाद जाधव हे स्पर्धक पात्र ठरले होते. या सर्वांमध्ये विजेतेपदाच्या खिताबासाठीची चुरस अतिशय सूरमयी ठरली. सर्व गायकांनी उत्तम गाणी सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
जयंत पानसरेचं “सजदा करू मै तेरा सजदा” आणि “विठ्ठला कोणता हा झेंडा घेऊ हाती”, महेश कंटेचं “तीर्थ विठ्ठल” आणि "टिक टिक वाजते डोक्यात", रेश्मा कुलकर्णीचं “केसरीया बालम” आणि “ही पोली साजूक तुपातली”, प्रल्हाद जाधवचं “डौल मोराच्या मानाचा” आणि “परदा है परदा”, जुईली जोगळेकरचं “मला म्हणत्यात हो म्हणतात पुण्याची मैना” आणि “वाजले की बारा” या गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. युगलगीतांमध्ये त्यांना सोबत मिळाली ती उर्मिला धनगर, वैशाली भैसने माडे, सावनी रविंद्र, विश्वजीत बोरवणकर आणि राहूल सक्सेना या सारेगमची मागची पर्व गाजवलेल्या गायक गायिकांची. याशिवाय स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांनीही गाणी सादर करत आपल्या आवाजाची जादू प्रेक्षकांवर पसरवली.
या महाअंतिम सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते खास अतिथी गायक हरिहरन आणि तौफिक कुरेशी यांची जुगलबंदी. हरिहरन यांनी आपल्या खास शैलीत त्यांची लोकप्रिय असलेली “मरीज इश्कका क्या है” आणि “बाखुदा अब तो मुझे कोई तमन्नाही नही” या गझल सादर केल्या आणि प्रेक्षकांनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने त्यांना दाद दिली.
प्रत्येक गाण्यानंतर रंगत वाढत गेलेल्या या महाअंतिम सोहळ्यात कोण विजेता ठरणार याची उत्कंठा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होती. हरिहरन यांनी जुईलीचे नाव उच्चारताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे अभिनंदन केले. महागायिका ठरलेल्या जुईली जोगळेकरला झी मराठीच्या वतीने एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. तर उपविजेता जयंत पानसरे आणि तिस-या क्रमांकावरील रेश्मा कुलकर्णीला प्रत्येकी 75 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या प्रल्हाद जाधव आणि महेश कंटे यांना प्रत्येकी 50 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. अतिशय रंगतदार आणि उत्कंठावर्धक ठरलेला हा महाअंतिम सोहळा येत्या रविवारी म्हणजे 13 एप्रिलला झी मराठीवरून सायंकाळी 7 वा. प्रसारित होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सोहळ्याची निवडक क्षणचित्रे...