आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस जानेवारीला भरणार मांजरेकर गुरूजींची 'शाळा'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध साहित्‍यकृतींवरून चित्रपट बनवण्‍याची प्रथा हॉलिवूड व बॉलिवूडमध्‍ये मोठ्या प्रमाणावर आहे. भारतातील बंगाली चित्रपट याबाबतीत आघाडीवर आहेत. पण आता मराठीतही असे प्रयोग होताना दिसतात. मराठी वाचकांच्‍या मनात मिलींद बोकील यांच्‍या 'शाळा' या कादंबरीने खास जागा निर्माण केली आहे. त्‍यावर आधारित महेश मांजरेकर यांच्‍या 'द ग्रेट मराठा एन्‍टरटेन्‍मेंट एलएलपी' प्रस्‍तुत 'शाळा' हा चित्रपट प्रेक्षकांच्‍या भेटीस येतोय.
'शाळा'ची कथा घडते 1970च्‍या दशकात. व्‍यक्‍तीस्‍वातंत्र्यावर आलेली बंधने, तसेच सामाजिक व राजकीय दडपशाहीचा तो काळ. त्‍याच काळातील शाळा आणि त्‍यातील लहान मुलांचे भावविश्‍व रेखाटण्‍याचा प्रयत्‍न या चित्रपटातून करण्‍यात आला आहे. आणीबाणी या शब्‍दाचा अर्थही माहित नसणा-या पण शाळेचे नियम व अनुशासनाच्‍या माध्‍यमातून एक प्रकारची आणीबाणी अनुभवणा-या विद्यार्थ्‍यांची ही कथा आहे. शाळेत शिस्‍तीच्‍या नावाखाली बंधने लादणारे हेडमास्‍तर, भूगोल- नागर‍िकशास्‍त्रासारखा कंटाळवाणा विषय रंजक पद्धतीने शिकवणारे मांजरेकर सर, इंग्रजी विषयाप्रमाणेच अवघड वाटणा-या बेंद्रे बाई, शाळेतील विविध प्रकृतींचे विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि या सगळ्यात डोळ्यांच्‍या भाषेतून फुलणारी 'जोशी- शिरोडकर' प्रेमकथा नवोदित दिग्‍दर्शक सुजय डहाके यांनी हळुवार पद्धतीने मांडली आहे.
'शाळा' हा चित्रपट शाळेतील विद्यार्थ्‍यांच्‍या भावविश्‍वावर आधारित असला तरी हा बालचित्रपट नाही. कुमारवयात मुलामुलींच्‍या मनात फुलणारे प्रेम आणि भाव- भावनांविषयी बोलणारी ही कथा आहे. विशेष म्‍हणजे मूळ 'शाळा' या कादंबरीतील प्रसंग आणि पात्रांमध्‍ये काहीही बदल न करता हा चित्रपट बनवण्‍यात आला आहे.
चित्रपटाची पटकथा व संवाद अविनाश देशपांडे यांचे आहेत. चित्रपटाचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे दिएगो रोमर्रे या परदेशी सिनेमॅटोग्राफरने कलात्‍मक पद्धतीने चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. दिएगोने आतापर्यंत अनेक हॉलिवूडपटांचे चित्रीकरण केले आहे.
या चित्रपटातील मुख्‍य भूमिका साकारत आहेत अंशुमन जोशी आणि केतकी माटेगावकर. तसेच चित्रपटात दिलीप प्रभावळकर, संतोष जुवेकर, अमृता खानविलकर, नंदू माधव, देविका दफ्तरदार, जिंतेंद्र जोशी, वैभव मांगले, आनंद इंगळे, गणेश मयेकर, शशांक शेंडे, स्‍नेहल घायाळ आणि अश्विनी गिरी यांच्‍या महत्‍त्‍वपूर्ण भूमिका आहेत.
हा चित्रपट 20 जानेवारील संपूर्ण राज्‍यात प्रदर्शित होत आहे.