मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बलात्कारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या ड्रायव्हरने माजी अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्या घरी काम करणा-या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
आरोपी ड्रायव्हरचे नाव राजेंद्र गौतम उर्फ पिंटू मिश्रा आहे. तो साकीनाका येथील रहिवाशी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्रने पीडित तरुणीला शाहरुख किंवा बॉलिवूडमधील इतर बड्या व्यक्तिंच्या घरी काम मिळवून देण्याचे आमिष देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपी पीडितेला नालासोपारा येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि तिथे तिचा शारीरिक आणि लैंगिक छळ केला. वांद्रा पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीला अटक केली आहे. आज त्याला वांद्रा कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
शाहरुखच्या मुलीला शाळेत सोडणे-आणण्याचे काम करायचा राजेंद्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मुंबईतील साकीनाका येथील रहिवाशी आहे. तर संगीता बिजलानीची मोलकरीण वांद्र्यात राहते. ती मुळची लातूरची आहे. गेले आठ महिने ती संगीता बिजलानीकडे घरकाम करतेय. परंतु, बऱ्याच दिवसांपासून ती जास्त पगाराची नोकरी शोधत होती. त्यासाठी तिने पांडे नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्यानेच तिला राजेंद्रचे नाव सांगितले. गेल्या आठवड्यात त्याने राजेंद्रला मोलकरणीचा नंबर दिला. त्याने लगेचच तिला फोन करून 20 जूनला शाहरुखच्या बंगल्याजवळ बोलावले. ती तिथे पोहोचली, तेव्हा शाहरुख घरी नसल्याचे सांगून तो तिला नालासोपाऱ्याला घेऊन गेला होता, असा घटनाक्रम पोलिसांनी सांगितला. 35 वर्षीय राजेंद्र शाहरुखच्या मुलीला शाळेत सोडणे आणि आणण्याचे काम करत होता.
मुंबई सोडण्याची दिली धमकी..
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला तिच्या गावाचे तिकीटही काढून दिले होते. येथे राहलीस तर तुझी काही खैर नाही, अशी धमकीही त्याने तिला दिली होती. मात्र तरीदेखील ती दुसऱ्या दिवशी शाहरुखच्या बंगल्याबाहेर पोहोचली. तेव्हा तिला पाहून राजेंद्र चिडला आणि आणि त्याने तिला बेदम मारहाण केली.