आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘ध’ चा ‘मा’ करणार्या पेशवाईतील रोमांचक घटनांनी आजवर मराठी कादंबरीकार, चित्रपट दिग्दर्शक तसेच मालिकांना भूरळ पाडली होती. मात्र, मराठय़ांच्या शौर्याने चक्क हॉलीवूडलाही भुरळ पडली आहे.
अनेक पारितोषिक विजेता दिग्दर्शक रोनाल्ड जॉफी यांनी नुकतीच पेशवाईंचे शौर्य आणि रंगेलता मोठय़ा पडद्यावर साकारली आहे. हॉलीवूडपटात समाविष्ट होत असलेला हा पहिलाच मराठी विषय असल्याने मराठी चित्रपटसृष्टीची मान यानिमित्ताने निश्चितच अभिमानाने उंचावली आहे. अजय झणकर यांच्या द्रोहपर्व या कादंबरीतील अंश घेऊन दिग्दर्शक रोनाल्ड जॉफी यांनी सिंग्युलॅरिटी हा हॉलीवूड चित्रपट तयार केला. पेशवाईत घडलेल्या खुन सत्रानंतरचा रोमांचक इतिहास या कादंबरीत मांडला आहे.
पेशव्यांच्या दरबारात असलेल्या ‘तुळजा नाईक’ या सुंदर आणि शूर मराठा युवतीभोवती या चित्रपटाची कथा फिरते. तुळजा नाईकची भूमिका बिपाशा बसू हिने साकारली असून अतुल कुलकर्णीही या चित्रपटात रावजीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभय देओल उदाजीच्या भूमिकेत दिसेल. तुळजा नाईक आणि उदाजी यांच्या अयशस्वी प्रेमकथेचा धागा घेऊन चित्रपटाची बांधणी केली गेली असली तरीही चित्रपटात वारंवार बदल करुन कथा थोडीफार काल्पनिक करण्यात आली आहे. चित्रपट तयार करण्यापूर्वी महाराष्ट्रात लोकेशन पाहण्यासाठी आलेल्या रोनाल्ड जॉफी यांनी मिलिंद गुणाजी यांच्यासोबत भटकंती करुन क्षेत्रमाऊली सारखी ठिकाणं पालथी घातली. मिलिंद गुणाजी यांनी या चित्रपटात शिवा नावाची छोटेखानी भूमिका केली आहे.
मुख्यत: ब्रिटिश-मराठा युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार झालेला सिंग्युलॅरिटी या चित्रपटाचा ट्रेलर यंदा कान्स फेस्टिवलमध्येही दाखवण्यात आला. या चित्रपटातील अनेक भारतीय कलाकारांचा हा पहिलावहिला हॉलीवूड चित्रपट असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे एवढं नक्की. मराठी पार्श्वभूमी, हिंदी-इंग्रजी-मराठी कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाबद्दल आतापासूनच रसिकांत उत्सुकता आहे.
सिंग्युलॅरिटीला सोळा हजार हिट - अतुल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी तसेच विजय ठोंबरे या तीन मराठी अभिनेत्यांचा हा पहिला हॉलीवूड चित्रपट आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यांची या चित्रपटात पेशवा सरदारची मुख्य भूमिका आहे.
तुळजा नाईक या भूमिकेसाठी ऐश्वर्याला विचारण्यात आले होते. मात्र, अचानकच ही भूमिका बिपाशा बसूच्या पदरात पडली. बिपाशाने या चित्रपटात अनेक बोल्ड दृश्ये दिली आहेत. मुख्य नायकासाठी विवेक ओबेरॉयचा विचार सुरू असतानाच जॉश हरनेट या हॉलीवूड अभिनेत्याला बिपाशाच्या नायकाची भूमिका देण्यात आली. बिपाशा मराठा युवती दाखवण्यात आली असली तरी तिचे तुळजा नाईक हे नाव आणि संदर्भ वगळता तिच्या कपड्यांवरून मात्र ते स्पष्ट होत नाही. ‘सिंग्युलॅरिटी’ या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर सोळा हजार हिट्स मिळाले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.