आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका-निर्मात्या स्मिता तळवलकर अनंतात विलिन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्करोगाला हसत सामोरे जात अशा रुग्णांच्या आयुष्यातही आनंदाचे झाड लावणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री, स्मिता तळवलकर (59) यांच्या जगण्याचा झोका बुधवारी थांबला. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक वर्षांपासून स्मिताताई कर्करोगाशी झुंज देत होत्या. पण त्यांनी कधीही काम बंद केले नव्हते. अगदी काल-परवा येऊन गेलेल्या ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..’ या चित्रपटातही त्यांची भूमिका होती. आयुष्याच्या 59 वर्षांत त्या 40-42 वर्षे काम करत होत्या. वृत्त निवेदिका म्हणून पडद्यावर आलेल्या स्मिताताईंनी गडबड घोटाळा, तू सौभाग्यवती हो या चित्रपटांद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. पुढे दिग्दर्शिका आणि निर्मातीच्या भूमिकेत त्यांनी अनेक मालिकांबरोबरच कळत-नकळत, चौकट राजा, सातच्या आत घरात, आनंदाचं झाड, तू तिथं मी, असे चित्रपट पडद्यावर आणले. तळवलकर यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली.

माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेत्री सुहास जोशी, नीना कुलकर्णी, रमेश भाटकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, विश्वास मेहेंदळे, चंद्रकांत कुलकर्णी, अतुल परचुरे आदींनी अंत्यदर्शन घेतले.
(संग्रहीत छायाचित्र: स्मिता तळवलकर)