आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लव इज वाट \'या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी स्पीकरचा वापर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पूर्वीच्या काळी चित्रपट-नाटकाची जाहिरात करण्यासाठी गावोगावी बैलगाडी, रिक्षा, टेम्पोवर स्पीकर आणि पोस्टर लावून प्रचार केला जात असे. आज ही प्रथा बंद पडली आहे. मात्र, निर्माता लवी पिंटो यांनी पूर्वीची ही पद्धत अवलंबवण्याचे ठरवले आहे. त्यांची निर्मिती असलेल्या ‘लव इज वाट’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी गाड्यांवर स्पीकर लावून गावोगाव फिरण्याची योजना आखली आहे. विशेष म्हणजे याची सुरुवात औरंगाबाद येथून करण्यात येणार आहे.

पिंटो म्हणाले, माझा हा चित्रपट एक निखळ प्रेमकथा आहे. क्रांती रेडकर आणि अमित भानुशाली यात मुख्य भूमिका साकारत आहेत. अमित एका लेखकाच्या भूमिकेत असून क्रांती वाचनालयात नोकरी करणा-या मुलीच्या भूमिकेत आहे. या दोघांचे प्रेम कसे जुळते व ते एकत्र येऊन कसे परत दूर जातात याबाबतची कथा चित्रपटात दाखण्यात येणार असून रोहन सातघरे यांनी यावर काम केले आहे.

आमचा चित्रपट नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटापूर्वीच तयार झाला आहे. आम्ही व्हॅलेंटाइन डेची वाट पाहत होतो. त्यामुळे या चित्रपटासारखा आशय यामध्ये नसल्याचे पिंटो यांनी सांगितले. आमचा चित्रपट अगोदर प्रदर्शित झाला असता तर तुम्ही तो चित्रपट आमच्या चित्रपटावर आधारित आहे असे म्हटले असते. दोन्ही चित्रपटांत गोष्ट प्रेमाची असली तरी कलाकारांचे वय आणि सादरीकरण वेगळे आहे. 15 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

प्रचाराची सुरुवात औरंगाबादपासून
यापूर्वी सायकल, बैलगाडी, रिक्षा वा गाड्यांवर पोस्टर लावून चित्रपट-नाटकांची माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येत असे. गावोगाव जाण्याचा हा एक उत्कृष्ट मार्ग असल्यानेच हा मार्ग स्वीकारला आहे. औरंगाबादपासून चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात होणार आहे. यानंतर उस्मानाबाद, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबईसह संपूर्ण राज्यात अशा प्रकारे चित्रपटाचे प्रमोशन करणार आहोत. मात्र, केवळ पुण्यात प्रभात चित्रपटगृह न मिळाल्याने तेथे प्रचार करण्यात येणार नसल्याचे निर्माता लवी पिंटो यांनी सांगितले.