आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्वतंत्रते भगवती' मधील स्फूर्तीगीते नव्या पिढीला प्रेरणादायी - नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केलेले कार्य हे एका तपस्वी योद्धयासारखे होते. सावरकरांनी आपला आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वातंत्र्यदेवतेचे स्तोत्र म्हणण्यातच घालविला. सावरकर यांचे उत्तुंग साहित्य इतके प्रेरणादायी आहे की, आजही त्यांची प्रत्येक कविता युवकांच्या नसानसात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करते. सावरकरांच्या अशा प्रेरणादायी गीतांना अनोखे संगीत देवून स्वराधीश भरत बलवल्ली यांनी एक प्रकारचे फार मोठे राष्ट्रकार्यच केले आहे असे भावपूर्ण गौरवोद्गार गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्री नरेंद्र मोदी यांनी काढले. श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भरत बलवल्ली यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि युनुव्हर्सल म्युझिक ग्रुप निर्मित स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्फूर्तीगीतांच्या 'स्वतंत्रते भगवती' या अल्बमचे नुकतेच अनावरण करण्यात आले त्याप्रसंगी नरेंद्र मोदी बोलत होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, की अनेक महापुरुषांनी केलेला त्याग आणि बलिदान यांच्यामुळे आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेत आहोत. अशा महापुरुषांमध्ये सावरकर कुटुंबाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाभारतात श्रीकृष्णाने युद्धभूमीवर जशी गीता सांगितली त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कारागृहात गजाआड असताना स्वातंत्र्यदेवतेची स्फूर्तिकवने गायली. सावरकरांच्या अशा कार्यापासून नव्या पिढीला स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांच्या गीतांना स्वरबद्ध करून स्वराधीश भरत बलवल्ली यांनी राष्ट्रोद्धाराचे एक अनोखे कार्य केले आहे. भरत बलवल्ली यांचे संगीत 'स्वर्गीय संगीत' असून त्यांच्या या संगीत तपस्येतून नव्या पिढीला संस्कार, इतिहासाची तर ओळख होईलच पण त्याबरोबर पुरुषार्थ जागृतीची प्रेरणाही मिळेल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
भरत बलवल्ली यांनी संगीतबद्ध केलेल्या 'स्वतंत्रते भगवती' या अल्बमच्या दोन सीडी असून त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ''ने मजशी ने परत मातृभूमीला…. '', ''अनादी मी अनंत मी… '' यासारखी गाजलेली स्फूर्तिगीते आहेत. ही गीते स्वत: भरत बलवल्ली यांच्याशिवाय अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम, डॉ. जसपिंदर नरुल्ला, वैशाली सामंत, मंदार आपटे, नंदेश उपम यांनी गायलेली आहेत. विशेष म्हणजे या अल्बममध्ये सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रत्येक गीतांचे अभिवाचनही केलेले आहे. या अल्बममधील गीतांचे संहितालेखन श्री सच्चिदानंद शेवडे यांनी केले असून संगीत-संयोजन दिवंगत संगीतकार अनिल मोहिले यांचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही प्रमुख घटनांची साक्ष असणाऱ्या छायाचित्रांचा समावेश असलेले रंगीत मुखपृष्ठ हेही या अल्बमचे खास आकर्षण ठरले आहे.