सिनेमाची निर्माती दिया मिर्झासोबत तेजस महाजन.
आपणही काहीतरी करून दाखवू शकतो, असे बळ औरंगाबादने दिले. म्हणून मी हैदराबादला जाऊन उत्तम प्रकारे अभिनय करू शकलो. सौरभ घारापुरीकर यांच्यासारख्या गुरूंचे मार्गदर्शन मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. असे म्हणणा-या तेजस महाजानने बॉलिवूडची सौंदर्यवती विद्या बालनसह काम करून आपल्या अभिनयाचे झेंडे बॉलिवूडमध्ये रोवले आहेत.
विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. यात विद्याच्या जवळच्या मित्राचे पात्र औरंगाबादच्या तेजस महाजनने साकारले आहे. हैदराबाद येथे तीन वर्षे नाटकांमध्ये केलेला अभिनय आणि थेट बॉलीवूड प्रवास याबाबत त्याच्याशी केलेली बातचित..
अभिनयाची सुरुवात कोठून केली?
मला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. मी औरंगाबादचा असल्यामुळे मला योग्य एक्पोझर मिळाले नाही. पुढे मी हैदराबादला गेलो. तेथे ‘कलाभिषेक परिवार’ने मला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्लॅटफॉर्म दिला. त्यानंतर ‘उडान परफॉर्मिंग आर्ट्स’च्या अनेक नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. रंगधारा थिएटरमध्येही मी काही नाटके केली.
‘बॉबी जासूस’मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली?
हैदराबादमध्ये मी तीन वर्षे होतो. तेथे विविध थिएटरने नाटकांमध्ये केलेले काम, मित्रांचे सहकार्य यामुळेच मला बॉलीवूडमध्ये जाण्याची संधी मिळाली. हैदराबाद येथे ऑडिशन दिल्यानंतर मला तेथील सूत्रधार कास्टिंग एजन्सीने यात काम करण्याची ऑफर दिली आणि मी लगेच स्वीकारली.
या सिनेमात तुझी विद्याच्या मित्राची भूमिका आहे.
मी यात विद्या बालनचा जवळचा मित्र सोहेलचे पात्र साकारले आहे. सोहेल विद्याला कॅमेरा, गाडी, मोबाइल इत्यादी वस्तू तयार करून देण्यास मदत करतो. दोन गाणी, कॉमिक सीन आणि क्लायमॅक्स सीनमध्ये आहे. एकूण माझी जवळपास 14 दृश्ये आहेत, पण फार मोठी संधी मिळाली याचे समाधान आहे.
विद्या बालनसोबत काम केल्याचा अनुभव कसा राहिला?
मी तब्बल 13 दिवस विद्यासोबत शूटिंग केली. सर्व दिवस मी विद्यासोबत होतो. सिनेमाचे दिग्दर्शक समर शेख हे अत्यंत सहनशील स्वभावाचे असून त्यांनी मला प्रत्येकवेळी प्रोत्साहन दिले. मला एका कुटुंबाप्रमाणे वागणूक दिली.
भविष्यातील योजनांबाबत काय सांगशील?
सध्या मी मुंबईत एमबीएचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे मी आधी शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य देऊ इच्छितो. यादरम्यान एखादा अभिनयाचा कोर्स करण्याची माझी इच्छा आहे. अभिनय क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाली तर निश्चितच करेन.
यशाचे श्रेय कुणाला देतो?
उडान आर्ट्सचे सौरभ घारापुरीकर यांनीच मला नाटकांमध्ये काम करण्याची संधी दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी बॉलीवूडमध्ये जाऊ शकलो. त्यांच्यासोबतच हैदराबादचे मित्र आणि माझी मावशी यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो. महत्त्वाचे म्हणजे माझी आई पूजा महाजन आणि वडील हेमंत महाजन यांचे मार्गदर्शन, प्रेम, आशीर्वाद याशिवाय काहीच शक्य नाही. खरं तर याला यशदेखील म्हणणे योग्य नाही. सुरुवात नक्की आहे.