आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Distinguished Actor Vikram Gokhale Gets His First National Award Rather Belatedly

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

' उशीरा का होईना राष्ट्रीय पुरस्काराच्या रुपात कामाची पोचपावती मिळाली'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील नामवंत आणि ज्येष्ट अभिनेते विक्रम गोखले यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रात तब्बल पाच दशकांहून अधिक काळ काम करणार-या विक्रम गोखले यांनी रंगभूमीपासून ते छोटा आणि मोठ्या पडदा अशा प्रत्येक माध्यमात काम केले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या कारकिर्दीत विक्रम गोखले यांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. 'अनुमती' या मराठी सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

याविषयी विक्रम गोखले म्हणाले की,''हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे. आजवर अनेक पुरस्कार मिळाले. प्रत्येक पुरस्काराचे स्वतःचे एक महत्त्व आहे. मात्र राष्ट्रीय पुरस्कार माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या घरी अभिनंदनाचा वर्षाव होतोय.''

विक्रम गोखले यांना मिळालेल्या सरप्राईजमुळे ते भारावून गेले आहेत. या सरप्राईजविषयी सांगताना विक्रम गोखले म्हणाले की, ''मला अमिताभ बच्चन यांनी अभिनंदनाचे पत्र मिळाले. त्यांनी पत्रात म्हटले होते की, विक्रम ये तो बहोत पहेले मिलना चाहिये था.'' असो मी यावर काय म्हणू शकतो ? प्रामाणिकपणे सांगायचे म्हणजे राष्ट्रीय स्तरावर माझ्या कामाचे कौतूक होईल, असे मला कधीही वाटले नव्हते. मी मॉडेस्ट नाहीये. फक्त रिअ‍ॅलिस्टिक आहे. माझ्या लायब्ररीत एक पुस्तक आहे, 'द हिस्ट्री ऑफ पॉलिटिक्स ऑद ऑस्कर'. जर ऑस्करमागे राजकारण असेल तर मग इथे काय असेल ? स्वर्गालाच माहिती की आपल्या देशांत पुरस्कारांसाठी निवड कशी होते. मी कधीच पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. मी आनंदी आहे.

इरफान खानबरोबर हा पुरस्कार विभागून मिळाल्याचाही आनंद विक्रम गोखले यांनी व्यक्त केला. इरफानविषयी ते म्हणाले की, ''तो खूप चांगला अभिनेता आहे आणि या अभिनेत्याबरोबर पुरस्कार शेअर करताना मला आनंदच होतोय. मी त्याचा 'पान सिंग तोमर' हा सिनेमा बघितला आहे. आणि मला वाटतं की या पुरस्कारासाठी आमच्या दोघांची निवड योग्य आहे. खूप असे अभिनेते आणि सहकलाकार आहेत, ज्यांच्या कामाचे मी कौतूक करतो. अन्नू कपूर यांनादेखील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, याचाही मला आनंद आहे. शिवाय नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, सतिश शाह, पंकज कपूर, फारुख शेख, शबाना आझमी यांच्या अभिनयाची मी प्रशंसा करतो. शिवाय आमिर खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, नाना पाटेकर यांचाही अभिनय मला आवडतो.''

विक्रम गोखले यांनी पुढे सांगितले की, ''मी माझ्या कुटुंबातील चौथ्या पिढीतील कलाकार आहे. कपूर खानदानानंतर गोखले असे एक घराणे आहे, ज्यांची चौथी पिढी अभिनय क्षेत्रात आहे. भविष्यात काय होईल, हे मला ठाऊक नाही. कारण मला मुलगा नाही. माझ्या दोन मुली आहेत. दोघीही उत्तम नृत्यांगणा आहेत.''

संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील ऐश्वर्या राय बच्चनच्या संगीतकार वडिलांची विक्रम गोखले यांनी साकारलेली भूमिका लोकप्रिय झाली होती. या सिनेमाच्या शुटिंगवेळी खूप मजा केली असल्याचे विक्रम गोखले यांनी सांगितले. संजय लील भन्साळींविषयी विक्रम गोखले यांनी सांगितले की, ''संजू पोएटिक डिरेक्टर आहे. सिनेमाचे शुटिंग संपल्यानंतर एकदा तो मला भेटायला आला होता. मी जेव्हा दिग्दर्शनाकडे वळलो होतो, तेव्हा तो मला शुभेच्छा द्यायला आला होता. तो आजही माझ्या संपर्कात आहे.''

मुलाखतीदरम्यान विक्रमजींना त्यांच्या मेन्टॉर विजया मेहतांचा फोन येतो. फोन रिसिव्ह केल्यानंतर पुन्हा माझ्याशी बोलताना विक्रमजी म्हणाले की, ''आपल्या देशात कलाकारांचे गुरु असणे ही लाजिरवाणे समजले जाते. मात्र पाश्चिमात्य देशांत प्रत्येक कलाकाराचा गुरु असतो. एखादी भूमिका स्वीकारण्यापूर्वी गुरुचा सल्ला घेतला जातो. 'आघात' या सिनेमाच्यावेळी मला माझ्या गुरु भेटल्या. आघात सिनेमा बघितल्यानंतर त्यांनी त्यावेळी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी मला एक पत्र लिहून माझ्या अभिनयातील कमतरता सांगितल्या. माझ्या अभिनयात मी कुठे सुधारणा करायला हवी, ते मला त्या पत्रातून कळले. त्यानंतर गुरुदक्षिणा घेऊन त्यांनीच मला वेळोवेळी मार्गदर्शन करावे, असे मी ठरवले. आज मी जे काही आहे, ते फक्त विजयाजींमुळेच आहे.''

विक्रम गोखले यांचे एक स्वप्न आहे. याविषयी त्यांनी सांगितले की, ''आंधळ्या म्हाता-या माणसाची भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न आहे. स्पर्श या सिनेमात नसिरुद्दीन शाह यांनी साकारलेल्या भूमिकेसारखी भूमिका मला करायची आहे.''

भविष्यात आणखी एक सिनेमा दिग्दर्शित करण्याची त्यांची योजना आहे. यावेळी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमा भारतातबरोबरच परदेशातही चित्रीत करायचा आहे. विजया मेहता यांच्या होकारानंतरच ते हा प्रोजेक्ट करणार आहेत.