आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमक्षणांचा ‘टाइमपास’..

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लेले, नावाच्या टिपिकल कुटुंबातील प्राजक्ता जेव्हा पेपर टाकणारा थोडा उडाणटप्पू असलेल्या दगडूच्या प्रेमात पडते तेव्हा काय घडत असेल हे सांगण खरंतर कठीण नाही. पण हे प्रेम म्हणजे केवळ तू मला मिळाली नाहीस तर दुसर्‍याचीही होऊ देणार नाही या भावनेच्या पलिकडे नेणारी कथा म्हणजे रवी जाधवांचा नवीन चित्रपट ‘टाइमपास’.
केवळ टाइमपास म्हणून टीनएजमध्ये सहवासाचं आकर्षण निर्माण होतं पण परिस्थिती या आकर्षणाला कशी हाताळते यावर हा चित्रपट भाष्य करत असल्याचे चित्रपटातील प्रमुख कलाकार केतकी माटेगावकर, प्रथमेश परब आणि वैभव मांगले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास भेटीत सांगितले.
टाईमपास चित्रपटातून कोवळ्या वयातील पहिल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना 3 जानेवारीपासून बघायला मिळणार आहे. रवी जाधव यांनी दिग्दर्शीत केलेला आणि एस्सेल व्हिजन, अथांश कम्युनिकेशन निर्मित व झी टॉकीज प्रस्तुत या चित्रपटात वैभव मांगले, भालचंद्र कदम, मेघना एरंडे, उदय सबनीस, सुप्रिया पाठारे, भूषण प्रधान, उर्मिला कानिटकर यांच्या भूमिका आहेत.
तरुणांच्या दृष्टीने आताच्या प्रेमाचेही बारा वाजले असून त्याला ‘टाइमपास’ स्वरुप मिळाले असल्याने ही कथा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. चिनार-महेश यांनी सजविलेली गाणी चित्रपटातील गंभीरतेत थोडी गंमत आणण्याच प्रयत्न करतात. स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर आणि बेला शेंडे यांनी ही गाणी गायली आहेत.