(फोटो - टिस्का चोप्रा आणि हुमा कुरेशी)
मुंबई - 'गँग्ज ऑफ वासेपूर' फेम हुमा कुरेशी आणि टिस्का चोप्रा या दोन्ही बॉलिवूड अभिनेत्री उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'हायवे' या मराठी चित्रपटातून मराठी पडद्यावर झळकणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून दोघींच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
गिरीश कुलकर्णीने या चित्रपटाची कथा लिहिली असून त्याचीदेखील या चित्रपटात भूमिका असेल. टिस्का चोप्राची या चित्रपटात अत्यंत ताकदीची अशी खंबीर महिलेची भूमिका असून हुमाची भूमिका मात्र अद्याप कोणती असणार आहे याबाबत गोपनीयता बाळगण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाचा माणसाच्या जीवनावर झालेल्या परिणामावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. 'हायवे' या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडच्या नवख्या दोन कन्या मराठी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या दोघींनीही या चित्रपटासाठी मराठी भाषेत बोलण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.
सामाजिक आशयाची कथा
देऊळ, वळूसारख्या चित्रपटांच्या यशानंतर उमेश आणि गिरीश कुलकर्णी या जोडगोळीचा हा नवा चित्रपटदेखील सामाजिक आशय घेऊन लोकांसमोर येतो आहे. त्यात या चित्रपटाला बॉलिवूडचा अभिनय व ग्लॅमर लाभलेल्या दोन नट्या मिळाल्याने चित्रपटाचे महत्त्व वाढले आहे. उमेशच्या पुढील प्रोजेक्टमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीदेखील काम करण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. सध्या नवाजुद्दीन 'युद्ध' या मालिकेत
अमिताभ बच्चन यांच्याबरोबर एका छोट्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच
सलमान खान अभिनीत 'किक' चित्रपटातही त्याची छोटेखानी भूमिका आहे.