आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात आज ‘नटसम्राट’चा विश्वविक्रमी प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - प्रसिद्ध साहित्यिक वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या पल्लेदार लेखनामुळे अजरामर ठरलेल्या ‘नटसम्राट’ या नाटकाचे सलग आठ प्रयोग मंगळवारपासून (27 ऑगस्ट) पुण्यात सादर होणार आहेत.


तीर्थराज, रंगमैत्री आणि दादा कोंडके फाउंडेशन यांच्या वतीने या ‘नॉनस्टॉप’ प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी सकाळी 6 वाजता पहिला प्रयोग सुरू होणार आहे. अखेरचा आठवा प्रयोग 28 ऑगस्टला (बुधवारी) सकाळी 10 वाजता सुरू होईल. सलग 31 तास 45 मिनिटे अखंडपणे चालणार्‍या या विक्रमी नाट्यप्रयोगांची नोंद ‘गिनीज बुक’मध्ये व्हावी, असा प्रयत्न आहे.


‘नटसम्राट’ या नाटकाचा केंद्रबिंदू असलेल्या आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका गिरीश देशपांडे साकारणार आहेत. कावेरीच्या भूमिकेत मुक्ता पटवर्धन असणार आहेत. नाटकात एकूण दहा कलाकार असणार आहेत. गेल्या दशकभरापासून व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असलेल्या देशपांडे यांच्या पुढाकाराने ही विश्वविक्रमी उडी घेतली जात आहे. देशपांडे यांनी यापूर्वी नटसम्राट, बेबी, अवध्य, रखेली या नाटकांचे व्यावसायिक प्रयोग केले आहेत.


‘लिम्का बुक’मध्ये यापूर्वीच नोंद
गिरीश देशपांडे यांनी यापूर्वी एका दिवसात ‘नटसम्राट’ या नाटकाचे सलग तीन प्रयोग केले आहेत. त्यानंतर सन 2011 मध्ये 18 तास 30 मिनिटांमध्ये याच ‘नटसम्राट’चे सलग पाच प्रयोग रंगभूमीवर करण्यात आले. त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. आता 31 तासांचे सलग आठ प्रयोग करून त्यांना ‘गिनीज’चे शिखर गाठायचे आहे.


अमेरिकेचा विक्रम मोडणार
सलग सर्वाधिक काळ रंगभूमीवर नाट्यप्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम सध्या अमेरिकेतल्या ‘सेव्हन ओ क्लॉक’ या नाट्यसंस्थेच्या नावावर आहे. या संस्थेने सलग 23 तास 30 मिनिटे 54 सेकंद अखंडपणे नाटक सादर करून गिनीज बुकात आपले नाव कोरले आहे. हा विश्वविक्रम मागे टाकण्याचा प्रयत्न गिरीश देशपांडे व त्यांचे सहकारी पुण्यात करणार आहेत.