मुंबई - ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई’, ‘राजू बन गया जंटलमन’सारख्या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक उमेश घाडगे सध्या ‘जतीस्वर’ या बंगाली चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांचा ‘हेमलॉक सोसायटी’ या बंगाली चित्रपटाचा मराठी रिमेक बनविण्यात व्यग्र आहेत. या चित्रपटातील मुख्य भूमिका ऊर्मिला मातोंडकर साकारणार असल्याची माहिती आहे.
र्शीजित मुखर्जी यांचा ‘हेमलॉक सोसायटी’ हा चित्रपट डार्क कॉमेडी शैलीतील आहे. उमेश घाडगे यांच्या दिग्दर्शनावर विश्वास ठेवत मुखर्जी यांनी मराठी रिमेक बनविण्यास त्यांना परवानगी दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या सहायक दिग्दर्शनाचा अनुभव घेतल्यानंतर घाडगे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील कलाकार मराठी चित्रपट क्षेत्रातीलच निवडले जाणार असले तरी घाडगे ऊर्मिलाला मुख्य भूमिका ऑफर करणार असल्याची चर्चा चित्रपटवतरुळात आहे.
ऊर्मिलाने ‘आजोबा’ या सुजय डहाके दिग्दर्शित मराठी चित्रपटातून अलीकडेच मध्यवर्ती भूमिका साकारून मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिच्या भूमिकेसह ‘आजोबा’चे चांगले कौतुक झाले आहे. त्यामुळे घाडगे आपल्या चित्रपटाला ग्लॅमरदेखील प्राप्त व्हावे म्हणून ऊर्मिलाचा विचार करीत आहेत असे बोलले जात आहे. संहितेसह बाकी बाबी तयार असल्याने मुख्य भूमिका ठरली की ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे.