मुंबईः ज्येष्ठ नाटय-सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज (3 नोव्हेंबर) निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी रात्री पावणे तीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली सायली जहागिरदार, केतकी जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत. मुंबईच्या भाईदास हॉलमध्ये आज त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या (मंगळवार) त्यांच्या मुळगावी म्हणजे अहमदनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
64 वर्षीय अमरापूरकर यांनी हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. 80 ते 90 च्या दशकातील सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. 'सडक' या हिंदी सिनेमातील त्यांची तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ‘आखें’, ‘इश्क’,‘गुप्त’मध्ये त्यांनी विनोदी भूमिकांनासुद्धा न्याय दिला.
सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही अमरापूरकर यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या 'जनलोकपाल' मागणीच्या आंदोलनाला त्यांनी जाहिर पाठिंबा दर्शविला होता. तसेच डॉ. नरेद्र दाभोळकर यांची हत्या म्हणजे हे राज्य अराजकतेकडे चालले आहे, असेच समजावे लागेल. आता तरी सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून त्यांना श्रद्धांजली वाहावी, अशी भूमिका अमरापूरकर यांनी मांडली होती.
गेल्या वर्षी धुलीवंदनादरम्यान समोरच्या इमारतीत मोठ्या आवाजात डीजे लावून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांची त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. मात्र त्यामुळे जमावाने घरात शिरुन त्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली होती.