आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 75 व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांनी केले जगाला अलविदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचे आज (25 मार्च) सकाळी निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.30च्या सुमारास त्यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
नंदा यांचा जन्म 8 जानेवारी 1939 रोजी कोल्हापूरमध्ये एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील विनायक दामोदर मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. मास्टर विनायक यांच्या कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला होता. नंदा यांच्या बालपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे नंदा यांनी बालपणीच कामाला सुरुवात केली होती.
कसा सुरु झाला फिल्मी प्रवास...
बेबी नंदा या नावाने त्यांनी 1948 मध्ये मंदिर या सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर बालकलाकाराच्या रुपात पाऊल ठेवले आणि शेवटपर्यंत त्यांच्या नावापुढे 'बेबी' हा शब्द जोडलेला राहिला. बेबी नंदा यांनी बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु या सिनेमांध्ये काम केले. त्यानंतर मुख्य भूमिकेत, बहिणीच्या रुपात, पत्नीच्या रुपात, आईच्या रुपात आणि खलनायिका म्हणूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या.
तरूणपणीचे 'जब जब फूल खिले', 'तीन देवियां', 'दी ट्रेन', 'भाभी', 'काला बाजार', 'धूल का फूल', 'छोटी बहन', 'हम दोनों', 'गुमनाम' या सिनेमांत त्यांनी अभिनय केला होता. त्यांचे सर्व सिनेमे खूप गाजले. सिल्व्हर स्क्रिनवर नंदा यांची जोडी शशी कपूर यांच्यासह खूप गाजली. या दोघांनी एकूण आठ सिनेमांत एकत्र काम केले होते.
मराठी दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी हे त्यांचे भाऊ आहेत. जयश्री हे त्यांच्या वहिनीचे नाव आहे. नंदा यांचे नाव पाच वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकित झाले होते. 'आंचल' या सिनेमातील भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
सिनेसृष्टीपासून संन्यास घेतल्यानंतर नंदा आपल्या नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाच भेटायच्या. वहिदा रहमान, हेलन आणि साधन या त्यांच्या जवळच्या मैत्रीणी होत्या. सार्वजनिक ठिकाणी त्या सहसा हजेरी लावत नव्हत्या. मात्र 2010मध्ये 'नटरंग' या मराठी सिनेमाच्या प्रीमिअरवेळी त्या वहिदा रहमान, हेलन आणि साधना यांच्यासह दिसल्या होत्या.
बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा...
नंदा यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
सायरा बानो यांनी नंदा यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आम्हाला सांगितले, ''आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नंदा कालपर्यंत एकदम ठणठणीत होती. हेलन यांनी मला त्यांच्या तब्येतीविषयी सांगितले होते. शनिवारीच माझे नंदाशी बोलणे झाले होते. तेव्हा ती अगदी ठिक वाटली होती.''
सायरा यांनी पुढे सांगितले, की ''नंदा अगदी ठिक होती. फक्त तिच्या पायाचे थोडे दुखणे होते. नंदा नेहमी हेच म्हणायची, की मला उतारवयात कधीही हॉस्पिटलचे तोंड पाहायचे नाहीये. आता मी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ शकते. ती आता आपल्यात नाहीये.''
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या नंदा यांच्या सिनेमांविषयी...