मुंबईः ज्येष्ठ नाटय-सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे आज (3 नोव्हेंबर) निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी रात्री पावणे तीनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. अमरापूरकर यांच्या फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा अमरापूरकर, तीन मुली सायली जहागिरदार, केतकी जातेगावकर आणि रिमा गद्रे आहेत.
अहमदनगरमध्ये होणार अंत्यसंस्कारः
मुंबईच्या भाईदास हॉलमध्ये सदाशिव अमरापूरकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता त्यांच्या मुळ गावी म्हणजे अहमदनगरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी चालवायचे ऑटोरिक्शाः
सिनेसृष्टीत अडीचशेहून अधिक सिनेमांमध्ये
आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अमरापूरकर एकेकाळी ऑटोरिक्शा चालवून आपला उदरनिर्वाह करायचे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी ते नाशिकमध्ये ऑटो चालवत असे.
दोन वर्षे राहिले अज्ञातवासातः
आयुष्याच्या शेवटच्या काळात अमरापूरकर यांचा बॉलिवूडपासून मोहभंग झाला होता. दोन वर्षे अमेरिकेत अज्ञातवासात घालवल्यानंतर ते भारतात परतले होते. 2012मध्ये रिलीज झालेला बॉम्बे टॉकीज हा त्यांचा शेवटचा सिनेमा आहे.
टीव्हीवरसुद्धा सोडली अभिनयाची छापः
झीटीव्ही वाहिनीवरील 'शोभा सोमनाथ की' या मालिकेत अमरापूरकर यांनी अभिनय केला होता. या मालिकेतसुद्धा ते खलनायकाच्या रुपात झळकले होते. याशिवाय अमाल अलना दिग्दर्शित 'राज से स्वराज तक' या मालिकेच्या चार भागांत त्यांनी लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली होती. श्याम बेनेगल दिग्दर्शित 'डिस्कवरी ऑफ इंडिया' या मालिकेच्या चार भागांत त्यांनी ज्योतिबा फुलेंचे पात्र साकारले होते. याशिवाय 'कुलवधू' या झी मराठीवरील गाजलेल्या मालिकेतसुद्धा त्यांचे दर्शन घडले होते.