आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Veteran Marathi Actress Smita Talwalkar Passed Away

'चतुरस्र’ प्रवासाची अखेर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोर्‍या वर्णाची, मोठय़ा डोळ्यांची एक तरुणी दूरदर्शनच्या कार्यालयामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमाकरता येते. त्यावेळी डॉ. विश्वास मेहंदळे दूरदर्शनमध्ये होते. या तरुणीचा आवाजाचा पोत, लाघवीपणा पाहून मेहंदळे यांनी तिला ‘वृत्तनिवेदिका म्हणून काम करणार का?’ विचारले. मात्र तिचे सतरा वर्षे वय आणि शिक्षण बारावीपर्यंतच. दूरदर्शनच्या नियमांमध्ये ते बसत नव्हते. मात्र मेहंदळे यांनी तिच्यासाठी दूरदर्शनला या दोन्ही अटी शिथिल करायला लावल्या. आणि वयाच्या सतराव्या वर्षी ही तरुणी वृत्तनिवेदिका म्हणून रुजू झाली. ही तरुणी होती स्मिता तळवलकर. पुढे तिचा प्रवास अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शिका असा होत गेला. त्याआधी रंगभूमीवर सशक्त अभिनय करीत कलाक्षेत्रात त्यांनी वेगळा ठसा उमटवला.

तळवलकर यांच्याबरोबर दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील देखील दूरदर्शनमध्ये कार्यरत होत्या. मात्र तळवलकर यांच्याआधीच स्मिता पाटील यांनी चित्रपटक्षेत्रात अभिनेत्री म्हणून कारकीर्द सुरू केली होती. तळवलकर वृत्तनिवेदिका असतानाच पाटील यांनी आपली जीवनयात्राही संपवली. त्यांच्या मृत्यूवेळी नेमक्या दूरदर्शनच्या स्टुडिओत बुलेटिनच्या केवळ दोन मिनिटे आधी पोहोचलेल्या तळवलकर आपल्याच मैत्रिणीच्या निधनाची बातमी वाचावी लागणार, हे कळताच कोसळल्या होत्या.

सतरा वर्षे वृत्तनिवेदिका म्हणून काम केल्यानंतर तळवलकर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. साधारणपणे 1986मध्ये आलेले गडबड घोटाळा, तू सौभाग्यवती हो हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट. शिवरायांची सून ताराराणी, चेकमेट यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. मात्र केवळ अभिनयापुरतेच न थांबता वयाच्या 34व्या वर्षी त्यांनी चित्रपट निर्मितीक्षेत्रात पदार्पण केले. त्यासाठी त्यांनी ‘अस्मिता चित्र’ ही निर्मिती संस्थाही स्थापन केली. त्यांची निर्मिती असलेल्या ‘कळत नकळत’ या चित्रपटाला 37वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. विवाहबाह्य संबंधामुळे मुलांची होणारी परवड या चित्रपटात दाखवून त्यांनी नातेसंबंधांवरील एक वेगळा विषय हाताळला होता.

रंगभूमी, छोटा पडदाही गाजविला
स्मिता यांनी रंगभूमीवरही सुरुवातीच्या काळात काम केले. ज्येष्ठ दिग्दर्शिका लता नार्वेकर यांच्या प्रत्येक नाटकाची अनाऊंसमेंट त्या आवर्जुन करायच्या. ‘तू फक्त हो म्हण’ हे त्यांचे रंगभूमीवरील पहिले नाटक होते.नाटक-चित्रपटांबरोबरच त्यांनी अवंतिका, पेशवाई, कथा एका आनंदीची आणि अलिकडे गाजलेल्या उंच माझा झोका यांसारख्या मालिकांची निर्मिती करुन मालिकाविश्वातही वेगवेगळ्या विषयांची भर घातली. अखिल भारतीय मराठी नाटयपरिषदेच्या त्या प्रमुख कार्यवाहदेखील होत्या. त्यांनी ‘अस्मिता चित्र अँकॅडमी’चीदेखील पुणे, ठाणेसारख्या ठिकाणी स्थापन करुन माध्यम क्षेत्रात त्यांनी सुमारे 300हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले होते.
सामाजिक विषयाचे भान
कलाप्रांतात उत्तम सामाजिक भान, उत्तम नेतृत्व आणि अभिनय-दिग्दर्शनाची उमज असलेल्या स्मिता तळवलकर यांनी मसालेदार चित्रपटांच्या काळातही संवेदनशीलपणे कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, तरुणांचे प्रश्न आदी विषयांवर धाडसाने आपल्या ताकदीवर विविध कलाकारांसह चित्रपटांची केलेली निर्मिती व दिग्दर्शन मराठी चित्रपटसृष्टीला एक अनमोल देणच आहे असे म्हणता येईल.

‘चौकट राजा’चे यश
संजय सूरकर दिग्दर्शित ‘चौकट राजा’सारखा गतिमंद मुलाच्या भावश्विावर आधारित चित्रपटाची निर्मिती करुन त्यांनी त्यात मुलाच्या लहानपणीच्या मैत्रिणीचीही भूमिका केली होती. या चित्रपटाला राज्य शासनाचाही पुरस्कार मिळाला होता. सुरकर आणि स्मिता तळवलकर यांनी पुढे जोडीने अनेक उत्तम चित्रपट दिले. त्यातीलच ‘तू तिथे मी’ या चित्रपटाच्या निमित्ताने तळवलकर यांच्या कारकीर्दीमध्ये दुसर्‍यांदा राष्ट्रीय पुरस्काराची भर घातली. बिनधास्त या त्यांच्या चित्रपटाने तर त्यावेळच्या तरुणांवर दीर्घकाळ मोहिनी घातली होती.

आदरांजली
मराठी चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान
स्मिता तळवलकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले. - नरेंद्र मोदी,पंतप्रधान (ट्विटरवर)

मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व
स्मिता तळवलकर यांच्या जाण्याने त्यांच्या शैलीतल्या चांगल्या मालिका आणि चांगले चित्रपट आता आम्हाला बघावयास मिळणार नाहीत. त्या अत्यंत संवेदनशील कलाकार होत्या. आमच्या पिढीसाठी त्या एकप्रकारे मार्गदर्शकच होत्या. - श्रेयस तळपदे, अभिनेता

आठवणीतूनही जिवंत
स्मिता यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील एक सामाजिक भान असलेले, उत्तम आकलन असलेले व्यक्तिमत्त्व हरवले आहे. त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून मात्र त्या अद्यापही आमच्यात जिवंत आहेत. - संजय जाधव, दिग्दर्शक

उणीव नेहमीच जाणवणार
कळत-नकळत, सातच्या आत घरात यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून स्मिता तळवलकर यांनी अनेक सामाजिक विषय जाणतेपणाने हाताळले. त्यांच्या जाण्यामुळे अशा चित्रपटांची आता निश्चितच उणीव भासणार आहे. - रमेश भाटकर, ज्येष्ठ अभिनेते

कलावंत गमावला
स्मिता तळवलकर वृत्त निवेदिका असल्यापासून मी त्यांना पाहिले आहे. अनेक चढ-उतार पार करत त्यांनी दुर्धर आजाराबरोबरच चित्रपटक्षेत्रात येणार्‍या अनेक अडचणींचा मोठय़ा निकराने सामना केला. त्यांच्या जाण्याने एक तडफदार कलाकार, दिग्दर्शिका, निर्माती गमावली आहे. - डॉ. विश्वास मेहंदळे