आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - ‘द डर्टी पिक्चर’ व ‘कहानी’मधील वेगळ्या भूमिकांबद्दल कौतुक झालेली विद्या बालन आगामी ‘घनचक्कर’ चित्रपटातील विनोदी भूमिके संदर्भात नर्व्हस आहे.
शनिवारी मुंबईत इंडो- अमेरिकन असोसिएशनतर्फे आयोजित एका समारंभात विद्या बालन हिचा भारतीय सिनेसृष्टीतील योगदानाबाबत सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्या पत्रकारांशी बोलत होती. नमस्ते अमेरिका व इंडो अमेरिकन असोसिएशन फॉर आर्ट अँड कल्चरतर्फे करण्यात आलेल्या सत्काराबाबत विद्याने हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा क्षण असल्याचे सांगितले. सन्मान व आशीर्वादाची एकत्रित अनुभूती देणारा हा पुरस्कार असल्याचे विद्या सांगते. ‘घनचक्कर’ हा विद्याचा पहिलाच विनोदी सिनेमा असून येत्या ऑगस्टमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. पूर्वार्शमीचा ठग असलेल्या एका तरुणाची मध्यवर्ती भूमिका इमरान हाशमी करत असून त्याच्या अत्यंत महत्त्वकांक्षी पंजाबी पत्नीची भूमिका विद्या साकारणार आहे. या दोघांची गोष्ट सांगणारा हा वेगळाच चित्रपट असल्याचे विद्या सांगते. इमरान दोन ठगांच्या फेर्यात अडकतो. यातून गैरसमज होतात व सहजसुंदर विनोद निर्माण होत जातो असे सांगत विद्याने यापेक्षा अधिक सांगण्यास नकार दिला.
यूटीव्हीची निर्मिती व ‘आमिर’ तसेच ‘नो वन किल्ड जेसिका’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘घनचक्कर’ चित्रपटातून विद्या ‘डर्टी’ नंतर पुन्हा इमरानसोबत दिसणार आहे.
..बाकी कशाची पर्वा नाही! - विद्याचे वडील पी. आर. बालन उपस्थित होते. विद्याने डर्टी पिक्चरमध्ये अभिनय करण्याचे धाडस दाखवले ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. या चित्रपटात आपल्याला काहीही बीभत्स वाटले नसल्याची प्रतिक्रियाही त्यांनी नोंदवली. या संदर्भात विद्याने सांगितले की, मी स्वत: डर्टीच्या प्रसिद्धीसाठी चित्रपटगृहांमधून हजेरी लावत होते व माझ्या घरचे लोक पृथ्वी थिएटरमध्ये चित्रपट पाहत होते. मी तेथे पोहोचले तेव्हा चित्रपटाच्या शेवटी माझ्या मृत्यूचे दृश्य पाहून सगळेजण रडत होते. माझ्या आईवडिलांना माझे काम आवडले हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, बाकी कशाची पर्वा नाही, असे विद्या म्हणते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.