आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोंडके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर - अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय कोंडके यांची मंगळवारी निवड करण्यात आली आहे. कोंडके आणि विजय पाटकर यांच्यात लढत होऊन दोघांना प्रत्येकी 7 मते पडल्याने ज्येष्ठत्वाच्या आधारे पहिली सव्वा वर्ष कोंडके यांना तर उर्वरित सव्वा वर्ष पाटकर यांना अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला.

पूर्वीचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे हे कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरले होते. अशातच साडेसात लाख रुपयांची शिल्लक हा कळीचा मुद्दा बनला. पुण्यातील मानाचा मुजरा या कार्यक्रमावरील उधळपट्टीमुळे सलग दोन वर्षे महामंडळाच्या वार्षिक बैठकीत गोंधळ झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या वार्षिक सभेतही राडा झाला व सुर्वे यांनी राजीनामा दिला. यानंतर मंगळवारी दुपारी महामंडळाच्या येथील कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी आरोप प्रत्यारोप झाले. परंतु नंतर रीतसर निवडणुकीत कोंडके व पाटकर यांना समान मते मिळाली. यानंतर पहिल्या सव्वा वर्षांसाठी कोंडके यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. याही बैठकीत विरोधकांनी अनेक प्रश्नांची सरबत्ती केली.

सुर्वे यांनी शिल्लक रक्कम देण्यास मी बांधील नसल्याचे सांगितल्याने यावरून आणखी वादंग होण्याची चिन्हे आहेत. बैठकीला उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर, अभिनेत्री अलका कुबल, सतिश रणदिवे, प्रिया अरूण, सुभाष भुरके यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.


एकोप्याने काम करण्याची गरज : रामदास फुटाणे
मराठी चित्रपटसृष्टीच्या भल्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकोप्याने काम करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक,दिग्दश्रक रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. ते ही या वेळी महामंडळाच्या कार्यालयात उपस्थित होते. याआधी झालेल्या चुका टाळून यापुढे एकमेकांना सहकार्य करण्याची गरज आहे.